लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनैतिक संबंध असलेल्या महिलेचे दागिने गहाण ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर तिचा गळा दाबून खून केल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्येचा बनाव करणाºया ठेकेदाराला एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. शवविच्छेदन अहवालानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांचा सविस्तर जबाब नोंदविल्यानंतर आरोपी प्रियकराला पोलिसांनी जेरबंद केले.साहेबराव बाबूराव तायडे (४२, रा.पंचशीलनगर, तोरणा मंगल कार्यालयाच्या मागे, बीड बायपास परिसर) असे आरोपी ठेकेदाराचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे म्हणाले की, मृत मुन्नाबी सय्यद अकील (३६, रा. एकतानगर, जुना बायपास) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मुन्नाबी ही घटस्फोटित महिला तिचा मुलगा आणि मुलीसह बीड बायपास परिसरात राहत असे. ती आरोपीकडे बांधकाम मजूर म्हणून कामाला जाई. दरम्यान, त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यातून साहेबरावचे मृताच्या घरी सतत येणे-जाणे होते. काही दिवसांपूर्वी आरोपीने मुन्नाबीचे दागिने घेऊन ते गहाण ठेवले होते. दरम्यान, हे दागिने सोडून आणण्यासाठी ती साहेबरावकडे सारखा तगादा लावत असे. ४ डिसेंबर रोजी रात्री त्यांच्यात यावरून जोरदार भांडण झाले. यावेळी साहेबरावने तिचा गळा दाबून तिचा खून केला. यानंतर तिने गळफास घेतल्याचा बनाव केला आणि तिला घाटीत दाखल केले. दरम्यान, घाटीतील डॉक्टरांनी तिचे शवविच्छेदन केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोहेकॉ भानुदास खिल्लारे हे या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना घाटी प्रशासनाकडून शवविच्छेदन सविस्तर अहवाल नुकताच प्राप्त झाला. यात गळा दाबल्याने मुन्नाबीचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. यानंतर पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांचे आणि शेजाºयांचे म्हणणे ऐकून घेतले. अधिक माहिती घेतली असता मृताचा प्रियकर साहेबराव यानेच गहाण दागिने सोडविण्याच्या कारणावरून गळा दाबून तिला संपविल्याचे समोर आले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राहुल जाधव यांनी लगेच आरोपी तायडेला अटक केली.खून केल्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीएमआयडीसी, सिडको परिसरातील मुन्नी अखिल सय्यद (३४) या महिलेचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी (दि.३१ डिसेंबर २०१७) अटक केलेला साहेबराव बाबूराव तायडे (४२) याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी डी. एस. वमने यांनी ५ जानेवारी २०१८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.४सदर महिलेचा ४ डिसेंबर २०१७ रोजी खून झाला होता. यासंदर्भात घाटी पोलीस चौकीचे पोलीस नाईक भानुदास नारायण बिरुटे यांनी फिर्याद दिली होती. शासनातर्फे सरकारी वकील एन.ए. ताडेवाड यांनी काम पाहिले.
प्रेयसीचा खून; ठेकेदार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:55 AM