वाळूज महानगर : ३० वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी वाळूज एमआयडीसीत उघडकीस आली. ओळख पटू नये म्हणून तरुणाचा चेहरा विद्रुप केल्याचे दिसून आले. ही घटना वैयक्तिक वादातून घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. धम्मपाल शांतावन साळवे, असे मृत तरुणाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाळूज उद्योगनरीतील बंद पडलेल्या शॉर्प इंडस्ट्रिज कंपनीसमोर पदपथावर तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सदर ठिकाणी तरुणाच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेले दगड व गट्टुचे तुकडे दिसून आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर पथकाने ने घटनास्थळी दाखल होत रक्ताचे नमुने, रक्ताने माखलेली माती व दगडाचे नमुने घेतले आहेत.
दरम्यान, मृत तरुणाच्या खिशातून आधारकार्ड मिळून आले. त्यावरुन त्याची ओळख पटली. धम्मपाल शांतवन साळवे (रा. मालुंजा खु. ता. गंगापूर जि. औरंगाबाद) असे मृताचे नाव असल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनासाठी तरुणाचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. आधार कार्डवरील माहितीवरुन पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधत त्यांना बोलावून घेतले.
नातेवाईकांनी हा मृतदेह धम्मपाल याचाच असल्याचे सांगत तो काही दिवसापासून पत्नी व मुलांसह बजाजनगरातील चिंचबन कॉलनीत येथे वास्तव्यास असल्याचे सांगितले. त्याची पत्नी तीन-चार दिवसांपूर्वी भांडण करुन माहेरी गेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास फौजदार सतीश पंडीत हे करीत आहेत.