औरंगाबाद : बनावट कागदपत्रे सादर करुन एकाने युनियन बँक ऑफ इंडियाच्या न्यू उस्मानपुरा शाखेत बँक खाते उघडले. त्या खात्यात एनटीआर युनिर्व्हसिटी ऑफ हेल्थ सायन्स, विजयवाडा, आंध्रप्रदेश यांचा ९ लाख ९८ हजार २०० रुपयांचा बनावट धनादेश टाकला. या धनादेशावरील सहीची खात्री केल्यानंतर बँकेने वटविला. पैसे खात्यात जमा होताच त्याने सर्व पैसे काढून घेत बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी जवाहनगर ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
शुभम प्रकाश भिवसाने ( रा. प्लॅट नं.२४, स्मृती अपार्टमेंट, बन्सीलानगर) असे आरोपीचे नाव आहे. युनियन बॅक ऑफ इंडियाचे विधि अधिकारी कपील बिलवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम भिवसाने याने न्यू उस्मानपुरा येथील बँकेत खाते उघडण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण केली. आधारकार्डवर मुंबईतील पत्ता असल्यामुळे त्याने घरमालकासोबतचा भाडेकरारनामा, विज बील सादर केल्यामुळे खाते उघडले. त्याने १० ऑगस्ट रोजी युनियन बँक ऑफ इंडिया, विजयवाडा शाखेतील एनटीआर युनिर्व्हसिटी ऑफ हेल्थ सायन्स संस्थेचा ९ लाख ९८ हजार २०० रुपयांचा बनावट धनादेश बँकेत जमा केला. बँक अधिकाऱ्यांनी धनादेशावरील सहीची शहानिशा केल्यानंतर वटवित भिवसाने याच्या बॅंक खात्यात पैसे क्रेडिट केले.
दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी विजयवाडा येथील बँकेच्या शाखेच्या व्यवस्थापकाने हेल्थ विद्यापीठाचा वटविलेला धनादेश हा संबंधित विद्यापीठाने दिलेला नसून, तो बनावट असल्याचे उस्मानपुऱ्यातील बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे धक्का बसलेल्या बँक अधिकाऱ्यांनी भिवसाने याने दिलेल्या पत्त्यावार धाव घेतली. तेव्हा त्या पत्त्यावर तो कधीच राहिलेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्याने भाडेकरारनामा, वीजबिल बनावट दिल्याचेही उघड झाले. भिवसाने याने बँकेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी निरीक्षक संतोष पाटील यांनी गुन्हा नोंदवून घेत सहायक निरीक्षक दिलीप चंदन यांच्याकडे अधिक तपासासाठी सोपवला.
पैसे काढुन घेतलेबनावट धनादेशाद्वारे बँकेची फसवणूक करुन ९ लाख ९८ हजार २०० रुपये बँक खात्यात जमा होताच सर्व पैसे भिवसाने याने काढून घेतले असल्याचेही स्प्ष्ट झाले आहे.