गावी नेण्यासाठी ‘ते’ भटकत होते
घाटीतील घटना : कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला मदतीचा हात
औरंगाबाद : अवघ्या ४ महिन्यांच्या बाळाचा घाटीत उपचार सुरु असताना दुर्धर आजाराने बुधवारी सकाळी मृत्यू झाला. बाळाच्या मृत्यूने आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यात जवळ एकही रुपया नसल्याने बाळाचा मृतदेह गावी घेऊन जायचा कसा, या चिंतेने दोघांनाही अश्रू अनावर झाले होते. ही बाब निदर्शनास येताच घाटीतील कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी २ हजार ८०० मदत देऊन त्यांना गावी रवाना केले.
अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव तुर्क येथील दाम्पत्य ४ महिन्यांच्या मुलाला घेऊन मंगळवारी घाटीत दाखल झाले होते. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून या बाळाला अधिक उपचारासाठी घाटीत रेफर केले होते. घाटीत बालरोग विभागात उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी बाळाने अखेरचा श्वास घेतला. शेतमजुरी करणाऱ्या बाळाच्या वडिलाजवळ गावी जाण्यासाठी पैसे नव्हते. मृत बाळाला कुशीत घेऊन आई सर्जिकल इमारतीसमोर बसली होती. तर वडील मदत मिळविण्यासाठी अश्रू ढाळत घाटीत फिरत होते. ही बाब समजल्यानंतर घाटीतील कर्मचारी विलास जगताप, के. के. ग्रुपचे अध्यक्ष अखिल अहमद, उपाध्यक्ष किशोर वाघमारे यांनी १८०० रुपये देऊन खाजगी वाहन केले. तसेच एक हजार रुपयांची मदत देऊन बाळाचा मृतदेह घेऊन या आईवडिलांना रवाना केले.
बाळ होते व्हेंटिलेटरवर
बालरोग विभागाचे डॉ. अमोल सूर्यवंशी म्हणाले, बाळाला दुर्धर आजाराचे निदान झाले होते. हे बाळ घाटीत आले तेव्हाच गंभीर अवस्थेत होते. त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. वजन कमी झाले होते. किडनीही फेल झाल्या होत्या. संसर्गामुळे बाळाचा मृत्यू झाला.