लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. उपयुक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या आधारे नागरिकांना जास्तीत जास्त समाधानकारक पाणी कसे देता येईल, या दृष्टीने मनपातील नवनिर्वाचित पदाधिका-यांनी गुरुवारी रात्री पाणीपुरवठ्याच्या अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीत अधिका-यांनी उपाययोजना करण्यास चक्क नकार देत, समांतरशिवाय पर्याय नसल्याचे सांगून टाकले. अधिका-यांची ही मानसिकता लक्षात घेऊन पदाधिका-यांनी चक्क बैठक गुंडाळली. तातडीने दोन निवृत्त अधिकारी पाणीपुरवठ्यासाठी घेण्याचा निर्णय घेण्यातआला.महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडून दररोज प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात येत आहे. गुरुवारी त्यांनी पाणीपुरवठ्याची बैठक मनपाच्या सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीस उपमहापौर विजय औताडे, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त वसंत निकम, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, सरताजसिंग चहेल यांची उपस्थिती होती. प्रारंभी महापौरांनी प्रास्ताविक करताना पाणीपुरवठ्याच्या त्रुटींवर प्रकाश टाकला. प्रत्येक वॉर्डात दूषित पाण्याचा प्रश्न, एका वॉर्डात किमान आठ ते दहा ठिकाणी लिकेज, जायकवाडी ते रेल्वेस्टेशनपर्यंत ठिकठिकाणी पाण्याची गळती, अनियमित पाणीपुरवठा या सर्व परिस्थितीवर मात करीत दर्जेदार पाणीपुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले. शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा सध्या लाइनमन बांधवांवर सुरू आहे. वरिष्ठ अधिकाºयांना लाइन आणि व्हॉल्व्ह माहीतच नाहीत. मागील १५ महिन्यांमध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या लाइन बदलल्या, व्हॉल्व्ह बदलले. जुने सामान कुठे गेले? याचे कोणतेही रेकॉर्ड नाही. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अनेक जण घरी जातील, असा इशाराही त्यांनी दिला. मागील सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून महापौरांच्या अंगावर खुर्च्या भिरकावण्याचे प्रकार झाले. माझ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून किंचितही गोंधळ झाल्यास माझ्यासारखा कोणी दुसरा वाईट राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पदाधिका-यांनी पाजले अधिका-यांना ‘पाणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:27 AM