वाळूज महानगर: करोडी शिवारातील विहिरीत सोमवारी २० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. गणेश अशोक बन्सोडे असे मृताचे नाव असून, तो दोन दिवसांपासून घाणेगाव येथून बेपत्ता होता.
गणेश अशोक बन्सोडे (रा.घाणेगाव ता.गंगापूर) हा दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. गणेशचा नातेवाईक शोध घेत असताना करोडी शिवारातील एका विहिरीच्या काठाजवळ गणेश याचे कपडे पडलेले नातेवाईकांना दिसून आले. त्यामुळे गणेशचे वडील अशोक बन्सोडे यांनी दौलताबाद पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. वाळूज अग्नीशामक दलाच्या जवानांनी इतर नागरिकांच्या मदतीने विहिरीतून बेशुद्ध अवस्थेतील युवकाला बाहेर काढले. हा युवक आपला मुलगा गणेश असून, तो दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे अशोक बन्सोडे यांनी सांगितले. गणेश बन्सोडे याला पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंदी करण्यात आली आहे. गणेश बन्सोडे याने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला हे अद्याप गुलदस्त्यात आहे.