वैजापूर : शहरातील श्रमीक नगर भागात राहणाऱ्या एका युवकाचा मृतदेह शनिवारी नारंगी-सारंगी धरणातील विहिरीच्या पाण्यात मिळून आला. वैभव रणछोडदास वैष्णव (१९) असे मयत युवकाचे नाव आहे. २८ जुलैपासून तो घरातून निघून गेला होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मागील काही दिवसांपासून वैभव नैराश्याच्या गर्तेत होता. त्यामुळेच त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असे नातेवाइकांनी सांगितले; परंतु त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
वैष्णव कुटुंबीय हे मूळ तालुक्यातील जांबरगाव येथील आहे. मोलमजुरी करून ते आपली उपजीविका भागवत असत. मागील काही वर्षांपासून ते वैजापूर शहरात दाखल राहत असे. वैभवचे वडील आजारी असल्याने घरीच होते. त्यामुळे वैभव हा शहरातील एका कापड दुकानात काम करून महाविद्यालयीन शिक्षण घेत असे.
मंगळवारी (दि.२७) त्याने कुटुंबियांसोबत रात्री ११ वाजेपर्यंत गप्पा मारल्या. सर्व जण झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर तो कामावर जातो, असे सांगून निघून गेला. तो घरी आलाच नाही. भावाने मित्र व नातेवाइकांकडे शोध घेतला; परंतु त्याचा शोध लागला नाही. घरी वापस येईल, या आशेेवर कुटुंबीय होते; परंतु शनिवारी सकाळी नारंगी सारंगी धरणातील गट नंबर १९ मधील विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह वैभव वैष्णवचा असल्याची ओळख पटली. याप्रकरणी भाऊ संदीप वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.
----
घर बांधण्याचे स्वप्न होते उराशी
आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी घर बांधण्याचे स्वप्न वैभव उराशी धरून होता. त्यासाठी तो परिश्रम घेत होता; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. दुकानातील नोकरीदेखील काही दिवसांपासून बंद होती. दादा आपण मिळून घर बांधू, असे तो मोठा भाऊ संदीपला नेहमी बोलायचा; परंतु परिस्थितीमुळे वैभव नैराश्याच्या गर्तेत आलेला होता.
-----
फोटो सह