औरंगाबाद : एस.टी. महामंडळातर्फे ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकास प्रवासात ५० टक्के सूट दिली जाते; परंतु या सुविधेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार वाढला आहे. बनावट ओळखपत्र दाखवून वयाची साठीही ओलांडलेली नसताना सवलत लाटली जात आहे. यातून आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ महामंडळावर येत आहे. त्यामुळे अशा बोगस ज्येष्ठ प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी महामंडळाने केली आहे.एस.टी.महामंडळाच्या साध्या आणि एशियाड बसेसमधून प्रवास करताना ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सूट दिली जाते. त्यामुळे ज्येष्ठ प्रवाशांचा प्रवास अवघ्या काही रकमेत होतो; परंतु ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या या सुविधेचा गैरफायदा काही जणांकडून घेतला जात आहे. या सवलतीचा फायदा घेण्यासाठी थेट बनावट ओळखपत्र तयार करण्याचे प्रकार सर्रास होत आहे. प्रवासादरम्यान अनेकदा गर्दीमुळे ओळखपत्र योग्यरीत्या तपासणीकडे दुर्लक्ष होते. त्यातून अशा बोगस ज्येष्ठ प्रवाशांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एस.टी.महामंडळाचे पर्यायाने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे १ ते ७ जुलैदरम्यान बनावट पास, ओळखपत्र तपासणी मोहीम हाती घेतली जात आहे. पोलिसांत तक्रारया मोहिमेमध्ये बनावट ओळखपत्र आढळून आल्यास संबंधित प्रवाशाची पोलिसांत तक्रार केली जाणार आहे. ज्येष्ठ प्रवाशांनी मतदान कार्ड, आधार कार्ड प्रवासादरम्यान सोबत ठेवावे, असे विभागीय वाहतूक अधिकारी एस.एस. रायलवार यांनी सांगितले.
बोगस ज्येष्ठ प्रवासी ‘एसटी’च्या रडारवर
By admin | Published: June 30, 2016 1:02 AM