मोबीन खान ,वैजापूरतालुक्यात आज रोजी कागदोपत्री व शासनदरबारी एकूण ४६ मजूर संस्थांची नोंद आहे़ मात्र त्यापैकी २५ धनदांडग्या व राजकीय लागेबांधे असलेल्या लोकांनी खोट्या दस्तऐवजाद्वारे स्वत: कागदी मजूर दर्शवून विविध योजनेअंतर्गत शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. आता या बोगसगिरीची सखोल चौकशी होणार असल्याने या बोगस संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. खऱ्या अर्थाने पात्र असलेले व दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या गोरगरीब मजुरांच्या हक्क, अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे़ विशेष म्हणजे शासनाच्या फसवेगिरीमध्ये संस्थाचालकासह प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची छुपी संमती असल्याची चर्चा आहे.तालुक्यात ४६ मजूर सहकारी संस्था विविध विभागांत काम करत आहेत़ या संस्थांवरचे पदाधिकारी कायद्याने मजूर असणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णयच आहे़ मात्र तालुक्यातील २५ मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत़संस्थेमधील लोकांनी मजूर असल्याचे प्रमाणपत्र घेऊन दारिद्र्यरेषेखालील उत्पन्नाच्या दाखल्याच्या आधारावर बोगस कागदपत्रे देऊन सहकार विभागाकडून मजूर संस्था नोंदणीकृत करून घेतल्या आहेत़ विशेष म्हणजे यातील बहुतांश संस्थांमध्ये चक्क लोकप्रतिनिधीसुद्धा मजूर म्हणूनच आहेत़ विशेष बाब म्हणजे मजूर कामगार सहकारी संस्था संघाच्या अध्यक्षांची जिल्ह्यात करोडो रुपयांची संपत्ती आहे़ अनेक नामांकित कामे सुरू आहेत, तरीसुद्धा मजूर असल्याचा आव आणून दरवर्षी लाखो रुपयांची कामे लाटली जात आहेत़ या संस्थांना काम वाटप करताना स्वत:च्या स्वार्थासाठी प्रशासकीय अधिकारीसुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून बसून राहत असल्याने अशा परिस्थितीत खरा मजूर घुसमटत आहे. ६ महिन्यांपूर्वी जवळपास दीडशे कामे मजूर सहकारी संस्थेला वाटप करण्यात आली होती़ संस्थाचालकाची कुठल्याही प्रकारची मागणी आणि यादी नसताना सहकार विभागाकडून मंजूर करून घेण्यात आली हे विशेष. शासनाच्या नियमानुसार कुठलीच कामे आजमितीस मजूर संस्था करत नाही़ काही संस्थांचा डोळा जिल्हा परिषद बांधकाम विभागातील त्या विशेष काम वाटपावर आहे़ तसेच तालुक्यात सुरू असलेल्या मजूर कामगार सहकारी संस्थेच्या बनवेगिरीकडे सहकार विभाग कधी कारवाईसाठी लक्ष केंद्रित करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वैजापूर तालुक्यातील बोगस २५ मजूर संस्था रडारवर
By admin | Published: April 13, 2016 12:27 AM