बाळासाहेब जाधव , लातूरबनावट कागदपत्राच्या आधारे चालकाची नोकरी लाटल्याचे उघड झाले असताना कारवाई ठप्प आहे. अधिकाऱ्यांतील अंतर्गत वादामुळे कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे बनावट कागदपत्र असल्याचे उघड असतानाही संबंधित ‘त्या’ चालकाला एक वेतनवाढ दिली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई करण्याचे आदेश असताना अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे.शेळगाव तालुका चाकूर येथील लक्ष्मण डिगांबर बोरुडवाड याने एस.टी. महामंडळातील भरती प्रक्रियेतून नोकरी मिळविण्यासाठी दहावी नापास असतानाही उदगीर येथील एका नामांकित संस्थेच्या नावे बनावट टीसी व मार्कमेमो तयार करून २०१२ च्या चालक पदाच्या भरतीमध्ये लेखी परीक्षा, मेडिकल चाचणी व मुलाखतीमध्येही उत्तीर्ण झाला. दहावी नापास असतानाही त्या कागदपत्राच्या आधारे उदगीर आगारामध्ये त्याला नोकरी मिळाली. एकवेळा पगारवाढही मिळाली. तब्बल तीन वर्षानंतर एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बनावट कागदपत्रांची माहिती मिळाली. त्याची तपासणी सुरक्षा व दक्षता अधिकारी व्ही.पी. जैन यांच्या पथकाने केली. सदरील कागदपत्रे त्या शाळेतील नसल्याचे पत्रही विभाग नियंत्रकांना प्राप्त झाले आहे. परंतु, एस.टी. महामंडळातील विभाग नियंत्रक, आस्थापना शाखेचे प्रमुख, सुरक्षा व दक्षता अधिकारी या तिघांनी सदरील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्या चालकावर किरकोळ बडतर्फीची कारवाई करून तीन वर्षांच्या सेवेनंतर सेवामुक्त करण्यात आले आहे. याबरोबरच इतर ३२ जणांनी बनावट कागदपत्राच्या आधारे नोकरी मिळविली आहे. त्याअनुषंगाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे फीस भरून कागदपत्र तपासणीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. शिक्षण मंडळाकडून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर बनावट कागदपत्रांद्वारे किती जणांनी नोकरी मिळविली, याची निश्चित आकडेवारी प्राप्त होणार आहे.
अधिकाऱ्यांच्या वादात अडकली बोगस कागदपत्रावरील कारवाई !
By admin | Published: March 10, 2016 12:33 AM