औरंगाबाद : ट्रंपोलिन आणि टंबलिन या खेळाचे बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळविणाऱ्या २५९ बोगस खेळाडूंना येत्या काही दिवसांत गुन्हेशाखा अटक करणार आहे. पोलिसांनी आता त्यांचा ठावठिकाणा शोधण्यास सुरवात केली आहे.
औरंगाबाद क्रीडा उपसंचालक कार्यालयातर्फे ट्रंपोलिन आणि टंबलिन खेळाच्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील सामन्यात सहभाग घेतल्याचे दाखवून २५९ खेळाडूंना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते. तत्कालीन क्रीडा अधिकारी भावराव रामदास वीर, क्रीडा उपसंचालक राजकुमार दत्तात्रय महादवाड यांनी या प्रकरणाचा मास्टरमाईंड अंकुश प्रल्हाद राठोड आणि एजंट शंकर शामराव पतंगे यांच्याशी संगणमत करून पैसे घेऊन हे प्रमाणपत्र दिल्याचे पोलीस तपासांत निष्पन्न झाले. जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चारही आरोपी सध्या गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे तपास करीत आहेत.
या तपासांत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. आरोपी पतंगे आणि राठोड यांनी दुसऱ्या एका खेळाच्या स्पर्धांचे निकाल मिळविले. खेळाडूंना कशा प्रकारे प्रमाणपत्र वाटप केले जाते याची प्रक्रिया आरोपी वीरकडून समजावून घेतली. त्यांच्या सांगण्यानुसार बनावट निकाल तयार करून त्यावर तत्कालीन क्रीडा आयुक्त नितीन करीर आणि ट्रंपोलिन आणि टंबलिन क्रीडा असोसिएशनचे पठाणिया यांच्या बनावट स्वाक्षरीचे कागदपत्रे तयार करून क्रीडा उपसंचालक कार्यालयास सादर केले. हा बनावट प्रस्ताव खरा असल्याचे समजून आरोपी महादवाड यांनी तब्बल २४८ जणांना राज्यस्तरीय, तर ११ जणांना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले होते.
७१ जणांचा दिवाणी न्यायालयात दावा२५९ पैकी ७१ जणांनी त्यांचे खेळाडूचे प्रमाणपत्र खरे असल्याचा दावा न्यायालयांत केला आहे. यातील अनेकजण सरकारी सेवेत आहेत. काहींनी अटकपूर्व जामीन मिळविला आहे. ७१ जणांची नावे एफआयआरमध्ये नव्हती. २५९ आरोपीपैकी कुणीही एकाही स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. एवढेच नव्हे तर त्यांना प्रमाणपत्र मिळविलेल्या वर्षात एकही राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा झाली नाही. त्यांची बनवेगिरी स्पष्ट झाली. पोलीस त्यांना अटक करणार आहे.
आरोपीचे बनावट पत्ते पोलिसांसाठी डोकेदुखीऔरंगाबाद क्रीडा उपसंचालक कार्यक्षेत्रांतर्गत रहिवासी खेळाडूनाच खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहेत. यावर उपाय म्हणून अनेकांनी ते औरंगाबादेतील रहिवासी असल्याचे नमूद करून प्रमाणपत्र मिळविले होते. प्रत्यक्षात ते औरंगाबाद क्रीडा उपसंचालक कार्यालयांच्या पाच जिल्ह्यांबाहेरील रहिवासी आहेत. अशा बोगस पत्ते असलेल्या खेळाडूंची नावे पोलिसांकडे आहेत. मात्र त्यांचे पत्ते चुकीचे असल्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांकरिता डोकेदुखी ठरणार आहे.