औरंगाबाद : सिडको, एन-३ भागातील अमोल दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी छापा टाकून ८७० किलो तूप आणि १५० किलो खवा जप्त केला. भेसळीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.सिडको एन-३ या उच्चभ्रू वसाहतीत दामोदर केदार यांची अमोल डेअरी आहे. या डेअरीतून भेसळयुक्त गावरान तूप आणि खव्याची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चं. भा. पवार, सहायक आयुक्त पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. राम मुंडे यांनी बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अमोल डेअरीवर छापा मारला. तूप आणि खव्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता, हा साठा भेसळयुक्त असल्याचा त्यांना संशय आला. या पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी त्यांनी ८७० किलो तूप आणि १५० किलो खवा, असा २ लाख ८४ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. अमोल डेअरीकडे अन्नपदार्थ विक्री करण्याचा परवाना नव्हता. तूप आणि खवा यांची कोणाकडून खरेदी केली, याची माहितीही दामोदर केदार यांनी दिली नाही, तसेच खरेदीची बिलेही त्यांना सादर करता आली नाहीत. त्यामुळे हा साठा भेसळीचा असल्याचा संशय सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केला.
डेअरीवाल्याचे तूपही गेले अन् खवाही...
By admin | Published: September 15, 2016 12:30 AM