औरंगाबाद : आपल्याशिवाय विभाग चालूच शकत नाही, असा गैरसमज निर्माण करून वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या मठाधीश झालेल्या काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा धाडसी निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. मंगळवारी स्थायी २१ आणि रोजंदारीवरील १० अशा एकूण ३१ कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या २१ स्थायी कर्मचाऱ्यांमध्ये ६ कक्ष अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
झाले असे की, बदली झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी होत्या. संघटनेच्या बळावर या कर्मचाऱ्यांनी मनमानी चालवली होती. दुसरीकडे, एकाच विभागात तीन किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदली करावी, असा सरकारी नियम आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने या बदल्याही केल्या होत्या; परंतु विभागप्रमुखांकडून अभय मिळाल्यामुळे ते कर्मचारी त्याच ठिकाणी कार्यरत होते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे काही कर्मचाऱ्यांच्या हेकेखोरपणाबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कोणत्या विभागात कोणता कर्मचारी कधीपासून काम करतो, त्याचा आढावा घेतला. तेव्हा हा प्रकार समोर आला. कुलगुरूंच्या आदेशानुसार कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी पहिल्या टप्प्यात २१ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले, तर कंत्राटदार संस्थेमार्फत तैनात १० रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
बदलीचा दुसरा टप्पा लवकरचयासंदर्भात कुलसचिव डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी सांगितले की, या बदल्यांना फार विलंब झाला आहे. त्याअगोदरच व्हायला पाहिजे होत्या. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर त्या लांबणीवर पडल्या. आज पहिल्या टप्प्यात २१ स्थायी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, बदल्यांचा दुसरा टप्पाही लवकरच अपेक्षित आहे.
कर्मचाऱ्यांच्या कोठून कुठे झाल्या बदल्याकक्ष अधिकारी पी. एन. निकम- राष्ट्रीय सेवा विभाग, बी. एन. फड - कुलसचिव कार्यालय, ए. ए. वडोदकर -सांख्यिकी विभाग, जी. जी. खरात - लेखा विभाग, वाय. एस. शिंदे -आस्थापना, डॉ. ए. यू. पाटील -पीएच.डी. विभाग. लघुलेखक ए. एम. वाघ -सामान्य प्रशासन विभाग, वरिष्ठ सहायक व्ही. जी. दरबस्तवार - परकीय भाषा विभाग, ए. टी. खामगावकर - लेखा विभाग, एस. आर. सरवदे -पीजी विभाग, ए. बी. मिसाळ - पीजी विभाग, आर. जी. कांबळे - म. फुले- डॉ. आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्र, एम. आर. वाणी - युनिक विभाग, एस.जी. पगडे - शारीरिक शिक्षण विभाग, कनिष्ठ सहायक एन. व्ही. पाडमुख - पीजी विभाग, भांडारपाल एस. बी. जगदाळे - मध्यवर्ती भांडार येथे यांच्यासह पाच शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.