मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : महसूल व कृषी विभागाने केलेल्या कपाशीवरील बोंडअळीच्या पंचनाम्यात लागवडीच्या क्षेत्रात तब्बल १९ हजार हेक्टर क्षेत्राची तफावत असल्याचे उघड झाले आहे. कृषी विभागापेक्षा महसूल विभागाच्या क्षेत्रात १९ हजार हेक्टरचे क्षेत्र वाढल्याने तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिका-यांनी जिल्हाधिकाºयांना पाठवण्यात येणाºया अहवालावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा अहवाल अजून तालुकास्तरावरच आहे.तालुक्यात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकाकडून करण्यात आलेल्या बोंडअळीच्या पंचनाम्यात असा मोठा घोळ झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीपेक्षा महसूल विभागाने थेट शेतकºयांच्या बांधावर केलेल्या बोंडअळीच्या पंचनाम्यात तब्बल १९ हजार हेक्टर क्षेत्र कपाशीचे जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने कृषी विभागाचे अधिकारी गोंधळले आहेत. विशेष म्हणजे आता नेमकी आकडेवारी खरी कोणाची समजावी, असा पेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांसमोर निर्माण झाला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात बोंडअळीमुळे वैजापूर तालुक्यातील १३५ गावात कपाशी पिकांची ऐन वेचणीत माती होऊन शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार प्रत्येक गावात तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांनी पंचनामे नुकतेच पूर्ण केले. मात्र, वैजापूर तालुका कृषी कार्यालय व तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पंचनाम्यात कपाशीच्या पेरणी क्षेत्रात मोठी तफावत येत असल्याने अधिकारीसुद्धा गोंधळले आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. तसेच लागवड योग्य क्षेत्र १ लाख ३४ हजार असून खरीप हंगामात यंदा प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र १ लाख १६ हजार इतके होते. त्यामध्ये ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात कपाशीची पेरणी करण्यात आल्याचा अहवाल तालुका कृषि अधिकाºयांनी जिल्हा कृषि कार्यालयाला पाठवला आहे. मात्र, महसूल विभागाने थेट शेतकºयांच्या बांधावर मोबाइल अॅप व जीपीएस यंत्राणेद्वारे केलेल्या पंचनाम्यानुसार तालुक्यात कपाशीचे क्षेत्र ९३ हजार हेक्टर भरत आहे. तब्बल १९ हजार हेक्टर क्षेत्र वाढल्याने आता नेमके आकडे खरे कोणाचे, असा प्रश्न अधिकाºयांसमोर उपस्थित झाला आहे. याविषयी तहसीलदार सुमन मोरे यांनी तातडीने तालुका कृषि अधिकारी विष्णू मोरे, गटविकास अधिकारी पुष्पा पंजाबी यांच्यासोबत बैठक घेऊन याविषयी चर्चा केली. मात्र तोडगा निघाला नाही.१९ हजार हेक्टर क्षेत्राचा ताळमेळ बसेनाखरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्रावर किती पेरणी झाली, याची माहिती कृषी विभागाकडून संकलित केली जाते. मात्र, तालुकास्तरावरून माहिती वेळेत व अचूक जात नसल्याने जिल्हा कार्यालयाचा ‘घोळ’ होत असतो. वैजापूरच्या तालुका कृषी कार्यालयाने जुलैच्या अहवालात तालुक्यात कपाशीचे क्षेत्र ७७ हजार हेक्टर पेरण्या झाल्याचे कळविले होते.महसूल विभागाने थेट शेतकºयांच्या बांधावर बोंडअळीच्या केलेल्या पंचनामा अहवालात अचानक त्यामध्ये वाढ होऊन ९३ हजार हेक्टर पेरणीचे क्षेत्र आले आहे. जर कागदावर पेरणीच्या आकडेवारीत घोळ होत असेल तर मोजणीत, पंचनाम्यात घोळ होत नसेल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.आमची आकडेवारी खरी-कृषी अधिकारीतालुक्यात कपाशीचे क्षेत्र ७७ हजार हेक्टर आहे, तसा पेरणी अहवाल आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. मात्र, महसूल विभाग आमच्या आकडेवारी पेक्षा १९ हजार हेक्टर क्षेत्र जास्त दाखवत असून त्यांची आकडेवारीमध्ये कुठेतरी चूक होत आहे. आमचा पेरणी अहवाल बरोबर आहे, असे तालुका कृषी अधिकारी विष्णू मोरे यांनी सांगितले.आम्ही थेट बांधावर पंचनामे केले -तहसीलदारशासनाचा आदेश आल्यानंतर तब्बल एक महिना महसूलच्या कर्मचाºयांनी शेतकºयांच्या बांधावर जावून बोंडअळीचे पंचनामे पूर्ण केले असून त्यामध्ये ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे पिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आमची आकडेवारी चुकीची नाही, असे तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.
बोंडअळीच्या पंचनाम्यात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:30 AM