औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या कार्यालयात फोन येतो आणि विमानतळाच्या चेक इन एरियात बाॅम्ब ठेवल्याची महिती दिली जाते. या फोनमुळे ‘सीआयएसएफ’चे जवान, पोलीस प्रशासन वेळीच सतर्क होतात अन् काही वेळातच बाॅम्ब निकामी करतात; पण घाबरू नका, हा काही खराखुरा प्रसंग नाही; पण ‘मॉक ड्रील’च्या निमित्ताने विमानतळावर गुरुवारी अनेकांनी हा थरारक प्रसंग अनुभवला.
चिकलठाणा विमानतळावर सकाळी १०.१० ते ११.१० वाजेदरम्यान हा माॅक ड्रिल घेण्यात आला. यामध्ये ‘सीआयएसएफ’चे जवान, त्यांचे श्वान पथक, बाॅम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक आणि विमान कंपन्यांचे कर्मचारी असे १०७ जण सहभागी झाले होते. श्वान पथकाकडून विमानतळाची तपासणी करण्यात आली. तेव्हा एका बॅगमध्ये बाॅम्ब असल्याचा सिग्नल श्वानाने दिला. त्यानंतर काही मिनिटांतच हा बाॅम्ब सुरक्षितरीत्या निकामी केला जातो. एखादा प्रसंग उद्भवल्यास वेळीच त्यावर नियंत्रण मिळवून कमीत कमी हानी टाळण्याच्या दृष्टीने यंत्रणा कितपत सक्षम आहे आणि त्यासाठी कोणत्या अडचणी येतात हे जाणून घेण्यासाठी हा माॅक ड्रिल घेण्यात आला.
ड्रीलनंतर मार्गदर्शन
ड्रीलनंतर ‘सीआयएसएफ’चे उप कमांडंट पवनकुमार, विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी मार्गदर्शन केले. ‘सीआयएसएफ’ असिस्टंट कमांडंट एम. के. झा, निरीक्षक रूपाली ठोके, प्रमोद जावळे, प्रदीप कुमार, सी. एच. भानू, काॅन्स्टेबल नारायण जाधव, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ..
विमानतळावर माॅक ड्रीलमध्ये तपासणी करताना बाॅम्ब शोधक व नाशक पथक.