सोयगाव : मराठवाड्यात कपाशी लागवडीत अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांच्या नुकसानीपोटी ना बोंडअळीचे अनुदान, ना पीकविमा मंजूर होईना. त्यामुळे तब्बल ३२ हजार हेक्टरवरील खरिपाच्या कपाशी पिकाच्या नुकसानीची शेतकऱ्यांना अध्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
सोयगाव तालुक्यात ३२ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. कपाशीच्या दुसऱ्याच वेचणीत बोंडअळींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना कपाशी पिके उखडून फेकावी लागली. त्यातच अतिवृष्टीमुळे काही भागात कपाशी पिके बोंडासह पुराच्या पाण्यात वाहून गेली. सोयगाव तालुक्याची सरासरी अंतिम आणेवारी ४७ टक्के असूनही ७२ तासांच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांचे पीकविम्याचे स्वप्न भंगले आहे.
सोयगाव तालुक्यात यंदाच्या वर्षात बोंडअळीचे ना अनुदान मिळाले, ना पीकविमा. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली असून दोन्ही नुकसानीच्या निकषातून सोयगाव तालुका वगळला आहे. तालुक्यात तब्बल २८ हजार हेक्टरवरील कपाशी पीक बोंडअळीने शंभर टक्के बाधित झाले होते. याची पाहणी कृषी आणि महसूल पथकांनी करून शंभर टक्के नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे. मात्र, या अहवालावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने सोयगाव तालुका बोंडअळीच्या मदतीपासून वगळला आहे. आधीच अतिवृष्टीच्या नुकसानीतून वगळल्याने सोयगाव तालुक्याला बोंडअळीच्या नुकसानीसह आता पीकविम्याच्या निकषातही कंपन्यांनी शेतकऱ्यांना कोंडीत पकडले आहे. बोंडअळींचा नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहे. पीकविम्याच्या रकमेवर टांगती तलवार आहे.