उमरगा : तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांमधील पहिली ते आठवीच्या एकूण ३२ हजार ७४० विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी १ लाख ८५ हजार ६५९ पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. सध्या तालुका प्रशासनाकडे एकूण पुस्तकांपैकी १ लाख ६५ हजार ८४५ पुस्तके प्राप्त झाली आहेत.नवीन शैक्षणिक वर्षास १५ जून पासून प्रारंभ होणार आहे़ शाळेच्या पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती वाढावी यासाठी शासनाच्या वतीने खाजगी व जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी करण्यात येणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या ३२ हजार ७८० विद्यार्थ्यांना बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, परिसर अभ्यास, सुलभभारती सामान्य विज्ञान, इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल ही क्रमिक अभ्यासक्रमाची १ लाख ८५ हजार ६५९ पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत.इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना बालभारती, माय इंग्लिश, गणित या विषयांची एकूण १० हजार ९५६ पुस्तके देण्यात येणार आहेत. इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मात्र इंग्लिश बुक, गणित, बालभारती मिळून ११ हजार २५० पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, परिसर अभ्यास उस्मानाबाद या विषयाची एकूण १२ हजार ३२ पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. चौथीच्या एकूण विद्यार्थ्यांना तिसरीप्रमाणेच गणित, परिसर अभ्यास, बालभारती, माय इंग्लिश या विषयाची १६ हजार ३४० पुस्तके देण्यात येणार आहेत.पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बाल भारती, माय इंग्लिश बुक, गणित परिसर, अभ्यास भाग एक, भाग दोन सुलभ भारती या विविध विषयांची २४ हजार ५५५ पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. सहावीतील विद्यार्थ्यांना बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास नागरिक शास्त्र, सुगम भारती या विषयाची एकूण ३० हजार ९६६ पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बालभारती, सामान्य विज्ञान, माय इंग्लिश बुक, गणित, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सुलभ भारती, सुगम भारती या सर्व विषयांची ६२ हजार १९६ पुस्तके देण्यात येणार आहेत.
३२ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके
By admin | Published: May 31, 2016 11:25 PM