वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे नेटकॅफे, प्रिटींग व हॉटेल व्यवसायात चांगलीच तेजी आली आहे. लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान ग्रामपंचायत निवडणुकीत भरुन निघण्याची शक्यता व्यवसायिकातुन वर्तविली जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम रंगात येत आहे. वाळूज एमआयडीसीत जवळपास ४ हजार लहान मोठे कारखाने असून या कारखान्याकडून ग्रामपंचायतीला दरवर्षी कोट्यवधी रुपयाचा कर मिळतो. कारखान्याकडून मिळणाऱ्या करामुळे जोगेश्वरी, वाळूज, वळदगाव, पंढरपूर, रांजणगाव, नारायणपूर आदी ग्रामपंचायती अर्थिकदृष्टया सक्षम म्हणून ओळखल्या जातात. या श्रीमंत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. या निवडणुकीच्या रणसंग्रामात बाजी मारण्यासाठी अनेकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा सुरु केली असून मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे काम सुरु आहे. गावातील सामजिक उपक्रम, जयंती व इतर कार्यक्रमात दावेदार हजेरी लावुन मतदारांना विनवण्या करीत असल्याचे चित्र वाळूजमहानगरात ठिक-ठिकाणी पहायवास भेटत आहे.
व्यावसायीकांची सध्या चांदी
या निवडणुकीत ऑनलाईन पद्धतीने नामांकन भरावे लागत असल्यामुळे नेटकॅपेवर भावी सदस्यांची चांगलीच झुंबड उडते आहे. नामांकन भरण्यासाठी नेट कॅफे चालकांनी मागितलेले शुल्क उमेदवार मुकाटपणे भरत आहे. उमेदवारांनी जाहिरनामे तयार केले असून ते छापण्यासाठी डाटाही प्रिटींग व्यवसायिकांना दिला आहे. निवडणुकीचे चिन्ह मिळताच जाहिरनाम्याची पत्रके छापण्याच्या ऑर्डर मिळाल्या असल्याचे प्रिटींग व्यवसायिक दत्तात्र्य वर्पे यांनी सांगितले. या शिवाय व्हॉटसॲप, सोशल मिडीयावर प्रचार करण्यासाठी उमेदवारांनी नेट कॅफे व प्रिटींग व्यावसायिकाकडून मजकुर तयार करुन घेतला आहे. या निवडणुकीमुळे हॉटेल व ढाबे चालकाचा व्यवसायही चांगलाच वाढला आहे. नाईट कर्फ्यू नसता तर आणखी चांगला व्यवसाय झाला असता अशा प्रतिक्रिया हॉटेल व्यवसायिकातुन वर्तविल्या जात आहे.
-----------------