औरंगाबाद : ओसाड जमीन ते दिमाखदार इमारत हा मराठवाडा साहित्य परिषदेचा प्रवास मी पाहिला आहे. परिषदेमध्ये असणे माझ्यासाठी आयुष्यभराचा आधार आहे. त्यामुळे परिषदेने जीवन गौरव पुरस्कार जाहीर करून केलेला सन्मान माझ्यासाठी मोलाचा आहे, असे मनोगत प्राचार्य प्रतापराव बोराडे यांनी एमजीएमतर्फे आयोजित सत्कार साेहळ्यात व्यक्त केले.
मराठवाडा साहित्य परिषदेने प्रतापराव बोराडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर केल्यानिमित्त एमजीएम विद्यापीठ तसेच वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, कुलसचिव प्रा. आशिष गाडेकर आणि भाऊ शिंदे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बोराडे म्हणाले की, १९७५-७६ साली औरंगाबादेत आलो तेव्हा अनंत भालेराव, बापू काळदाते, ना. धो. महानोर यांचे सान्निध्य मिळवून देणारी मसाप माझ्यासाठी आधारवड होती. जेएनईसी उभारण्यात आणि त्याचा नावलौकिक करण्यात प्रतापरावांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रतापराव हेच खऱ्या अर्थाने आजच्या एमजीएम विश्वाचे जनक आहेत, अशा शब्दांत अंकुशराव यांनी अध्यक्षीय मनोगत मांडले. डॉ. आशा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. रेखा शेळके यांनी आभार मानले.
फोटो ओळ :
प्रतापराव बोराडे यांचा सत्कार करताना अंकुशराव कदम, डॉ. सुधीर गव्हाणे, प्रा.आशिष गाडेकर.