औरंगाबाद : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा फक्त राजकारण्यांचा आहे. आम्ही सीमा जोडण्याचे काम करतो. प्रवासी सेवा देणे हेच आमचे काम आहे, कर्तव्य आहे. सीमावादात आमची काहीही भूमिका नाही, अशी भावना कर्नाटकच्या बसचालकांनी व्यक्त केली. मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी पहाटे ठाकरे गटाच्या समर्थकांनी कर्नाटकच्या बसला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत असून, त्याचे पडसाद उमटत आहेत. कर्नाटक येथील विविध भागांतून औरंगाबादेत बस दाखल होतात. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानकात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. या सगळ्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी सकाळी साडेपाच वाजता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद-निपाणीसह कर्नाटकच्या दोन बसला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली. बसवर ‘जय महाराष्ट्र’ असेही लिहिण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
चालक-वाहक भयभीतमध्यवर्ती बसस्थानकातील घटनेनंतर कर्नाटक बसवरील चालक-वाहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बस पुढे घेऊन जावी की नाही, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. बसला काळे फासण्याच्या घटनेनंतर औरंगाबाद-बिदर तत्काळ रवाना झाली. तर हुबळी, बेळगाव, निपाणी, गुलबर्गा बसचे चालकांनी पुढे जाणे टाळले. पोलिसांच्या सूचनेनुसार पुढे रवाना होण्याचा निर्णय घेण्यात आला. या सगळ्यामुळे प्रवाशांचीही गैरसोय झाली.
बसला काही झाले तर आम्हाला शिक्षाबसला काहीही झाले तर त्याची शिक्षा आम्हाला मिळते. वेतनातून रक्कम कपात केली जाते. प्रवासी सेवा देणे आमचे कर्तव्य आहे. सीमावादात आमची काहीही चूक नाही, असे चालक-वाहक म्हणाले.