लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : येलकी येथील सीमा सुरक्षा बलाच्या कॅम्पमधील ‘जवान बॅरेक’चे उद्घाटन सीमा सुरक्षा बलाचे विशेष महानिरीक्षक आदित्य मिश्रा यांच्या हस्ते पार पडले. वीज, पाणी उपलब्ध न होणे हा कॅम्पच्या प्रगतीमधील मोठा अडथळा असून जि.प.प्रशासन व महावितरणच्या उदासीनतेबाबत त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील सीमा सुरक्षा बलाचा ट्रेनिंग कॅम्प कार्यान्वित झाला आहे. या कॅम्पमधील ‘जवान बॅरेक’चे उद्घाटन विशेष महानिरीक्षक आदित्य मिश्रा यांचे हस्ते झाले. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हा सोहळा पार पडला. यावेळी कमांडंट अरविंदकुमार चौधरीसह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी जवानांना त्यांनी संबोधीत केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मिश्रा म्हणाले की, आम्ही या कॅम्पचे काम गतीने करण्यासाठी प्रयत्नशील आहोत; परंतु काही मूलभूत सुविधा मिळण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे. २५ गाव पाणीपुरवठ्यांतर्गतचे पाणी जोडणी मिळण्यासाठी जून २०१७ मध्ये १५ लाख रुपये जमा केले पण पाण्यासाठीच्या जोडणीचे काम अद्याप झाले नाही. महावितरणकडे जुलै २०१७ मध्ये ३९ लाख रूपये भरलेत. पण वीज खांबांची साधी पाहणीही अद्याप झाली नाही. ही महावितरणची व जि.प. प्रशासनाची उदासिनता कॅम्पच्या गतीमध्ये अडथळा निर्माण करीत आहेत. सर्व निवासस्थाने तयार होऊन कॅम्पमध्ये पूर्णक्षमतेने जवान राहू लागले तर परिसरातील उद्योग व रोजगारीला चांगला लाभ मिळेल, असेही ते म्हणाले.यावेळी महाप्रबंधक पी.के. खरे, अधीक्षक अभियंता महेंद्र गुप्ता, निरीक्षक (प्रशासन) एस.विरेंद्र सिंह, उपनिरीक्षक संतोष एम., उपनिरीक्षक प्रशासन विजयपाल सिंह, सहा. उपनिरीक्षक शंभू राव, चेतन पवार, उपनिरीक्षक कविता नंदेश्वर, कैलास दान यांच्यासह इतर उपस्थित होते. वीज व पाण्याअभावी या जवानांचे हाल होत आहेत.
सीमा सुरक्षा बल वसाहतीत वीज, पाणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:25 AM