छत्रपती संभाजीनगर : प्रेमविवाह केल्यानंतर अनेकांकडून उधारीवर पैसे घेतले. हे पैसे फेडण्यासाठी तरुणाने चक्क जबरी चोरीचा मार्ग निवडला. पहिली चोरी झाल्यानंतर आवध्या चार दिवसांमध्येच त्याच्या हातात बेड्या पकडल्याची घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षिकेचे दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोघांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
सुनील अरुण सपकाळ (२१), रवी उर्फ गोलु एकनाथ महाजन (२०, दोघे रा.हायकोर्ट कॉलनी, संग्रामनगर, सातारा परिसर) अशी आरोपीची नावे आहेत. जळगाव जिल्ह्यातील सेलगावचे हे दोघे रहिवाशी आहेत. सुनील सपकाळ याने नुकताच प्रेमविवाह केला आहे. दोघेही ऑफिस बॉय म्हणून दुध डेअरी परिसरातील ज्वेलरीच्या एनएमएस शोरूममध्ये कामाला होते. त्याठिकाणी नोकरीला असलेल्या मुलीसोबतच सुनील प्रेमविवाह केला. त्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात पैसे मित्रमंडळीकडून जमा केले आहेत. हे पैसे परत देण्यासाठी संबंधितांनी तगादा लावल्यामुळे सुनीलने मंगळसूत्र चोरण्याची योजना रवीला सांगितली.
त्यानुसार दोघांनी ५ मे रोजी दाेघांनी सकाळीच दुचाकी काढली. उस्मानपुरा परिसरातील देवानगरीत सेवानिवृत्त शिक्षिका मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडल्या होत्या. त्या शिक्षिकेला दोघांनी बीड बायपासकडे जाण्याचा रस्ता विचारला. तेव्हा सुनीलने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावत दुचाकीवरून पोबारा केला. या घटनेचा समांतर तपास करताना गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के, प्रविण वाघ, सहायक फाैजदार सतीश जाधव, हवालदार सुधाकर मिसाळ, योगेश नवसारे, राजाराम डावखुरे, रविंद्र खरात, विजय घुगे, धनंजय सानप, शुभम वीर यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. आरोपी गावाकडे गेल्याची माहिती मिळाल्यामुळे पथक जामनेरला गेले होते. मात्र, चोरटे तेथून शहरात परतल्याची माहिती समजताच त्यांना राहत्या घरातुन ताब्यात घेतले. ही कारवाई निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात केली.
मंगळसूत्र वितळवून केली लगडआरोपींनी चोरी केल्यानंतर मंगळसूत्र देवळाई चौकातील तुळजाभवानी ज्वेलर्सचे मालक विलास बर्डे यांच्याकडे वितळुन लगड तयार केली होती. पोलिसांनी ८० हजार रुपयांच्या लगडसह दुचाकी, दोन मोबाईल असा १ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.