औरंगाबाद : ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी वर्धन घोडे या दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खून केल्याच्या आरोपाखाली अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघांना सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी (दि.१०) दोषी ठरविले. या दोघांच्या शिक्षेबाबत मंगळवारी (दि ११ डिसेंबर) सुनावणी झाली. १४ डिसेंबरला त्यांना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.
टिळकनगरमधील गुरुकुंज हाऊसिंग सोसायटीतून २७ फेब्रुवारी २०१७ रोजी वर्धन विवेक घोडे या मुलाचे कारमधून अपहरण करून दौलताबाद घाटामध्ये त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. श्रेयनगरमधील नाल्यामध्ये त्याचा मृतदेह टाकण्यात आला होता. वर्धनची आई भारती विवेक घोडे (३८) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून खून करणारे अभिलाष सुधीर मोहनपूरकर (रा. टिळकनगर) आणि श्याम लक्ष्मण मगरे (रा. तडगूर, ता. मदनूर, जि. निजामाबाद, ह. मु. टिळकनगर), या दोघांना २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या होत्या. त्या दोघांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाअंती ७५० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
अभियोग पक्षातर्फे नाशिक येथील विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी यापूर्वीच्या युक्तिवादात घटनाक्रम विशद करीत सर्व पुराव्यांचा खुलासा करून पुराव्यांचे सर्व तपशीलही दिले होते. मृताला झालेल्या जखमा कशा प्रकारे होऊ शकतात त्याचा वैद्यकीय अहवाल, तसेच मृताचा फोटो, जखमा आणि गळा आवळण्यात आलेला रुमाल यांची सांगड घालून मृतदेहाजवळ सापडलेली चिठ्ठी, मृतदेह व रुमाल यांचे सबळ पुरावे व न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.
विशेषत: घटनाक्रमाची साखळी कशी जुळते हे डीएनए चाचणी, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे टॉवर लोकेशन्स, आदी वैज्ञानिक पुराव्यांद्वारे (सायन्टिफिक एव्हिडन्स), तसेच पेट्रोल पंपावरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या युक्तिवादाच्या पुष्ट्यर्थ अॅड. मिसर यांनी उच्च न्यायालयाच्या सुमारे १०० आणि सर्वोच्च न्यायालयाच्या २५ निकालांचे (केस लॉ) संदर्भ सादर केले. अभियोग पक्षाने एकूण ४१ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. अॅड. मिसर यांना अॅड. सुरेश गायकवाड आणि फिर्यादीतर्फे (असिस्ट टू प्रॉसिक्युशन) अॅड. विजय काळे यांनी सहकार्य केले.
आरोपींनी सादर केली चिठ्ठीआजच्या सुनावणीदरम्यान आरोपी अभिलाष मोहनपूरकर याने १० पानी चिठ्ठी वजा अर्ज न्यायालयात सादर केला. त्यात म्हटले होते की, त्याने आणि श्याम मगरे यांनी वर्धनचा खून केला नाही. ते दोघे (आरोपी), त्यांची मैत्रीण आणि वर्धन वाहनातून जात असताना पाच जणांनी त्यांना अडविले.पिस्तुलाचा धाक दाखवून वर्धन आणि दोन्ही आरोपींना गुडघ्यावर बसवून त्यांच्या मैत्रिणीवर बलात्कार केला. त्या पाच जणांनीच वर्धनचा खून केला, असे म्हटले होते; मात्र न्यायालयाने ती चिठ्ठी रेकॉर्डवर घेतली नाही, वाचून उभय पक्षाच्या वकिलांकडे दिली. या खून खटल्याची सुनावणी सात महिने चालली व सोमवारी त्याचा निकाल न्यायालयाने सुनावला.
या आरोपांखाली धरले दोषीन्यायालयाने वरील दोन्ही आरोपींना खून करणे (भादंवि कलम ३०२), पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे (भादंवि कलम २०१), अपहरण करणे (भादंवि कलम ३६३) आणि फौजदारीपात्र कट रचणे (भादंवि कलम १२० (ब)) या आरोपांखाली दोषी धरले.