पैठण : जायकवाडी धरणातील दोन्ही कालव्यातून मंगळवारी सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. खरीप संरक्षित पाळीअंतर्गत हे पाणी सोडण्यात आल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील १८३३२२ हेक्टरमधील खरीप पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे.पावसाने गेल्या २० ते २५ दिवसांपासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकांसाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी सोडण्यात यावी, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. मंगळवारी धरणाच्या डाव्या कालव्यातून ३०० व उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले. बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून गेवराई शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी मंगळवारी ५०० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले.खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसावर लाभक्षेत्रातील लाखो हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली होती. मात्र गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बाळसे धरलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. यामुळे शेतकऱ्यांनी धरणातून पाणी सोडा, अशी मागणी केली होती.
दोन्ही कालव्यांतून पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:59 AM