किनगावात चव्हाण यांचे वर्चस्व, बोरगाव अर्ज गावावर बलांडे यांचे वर्चस्व
फुलंब्री : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही सभापतींनी आपल्या गावातील ग्रामपंचायतीच्या वरील सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.
फुलंब्री तालुक्यातील गणोरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण या जिल्हा परिषदमध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती आहेत. तर वडोदबाजार गटाचे जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे हे बांधकाम सभापती आहेत. किशोर बलांडे यांनी बोरगाव अर्ज ग्रामपंचायतमध्ये सत्ता कायम ठेवली. तर अनुराधा चव्हाण यांनी किनगावात ग्रामपंचायतवर झेंडा फडकवला. बाबरा गटाचे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जैस्वाल यांनी बाबरा ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांना गावातून प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी निवडणूक झाली. यात जितेंद्र जैस्वाल यांनी उभ्या केलेल्या सर्वपक्षीय पॉनलला दहा जागांवर यश मिळाले.
पंचायत समिती सदस्याच्या गावातील परिस्थिती
तालुक्यातील वारेगाव येथील भाजपचे पंचायत समिती सदस्य असलेले एकनाथ धटिंग यांच्या ताब्यातील ग्रामपंचायत कॉंग्रेस पक्षाकडे गेली आहे. गणोरी येथील भाजपाच्या सदस्य सोनाली सोनवणे यांनी सत्ता कायम ठेवली. गिरसवळी ग्रामपंचायत पंचायत समिती सदस्य ऐश्वर्या गाडेकर यांच्या ताब्यात आली. पं.स. सभापती सविता फुके यांचे निमखेडा गावातील पॅनलला बहुमत मिळाले. सर्जेराव मेटे यांनी जळगाव मेटेची ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. पाल येथील ग्रामपंचायतमध्ये बाजार समितीचे सभापती चंद्रकांत जाधव यांच्या संयुक्त पॉनलला यश मिळाले आहे. यातील जिल्हा परिषद सभापती यांच्या ग्रामपंचायती ताब्यात आलेल्या असल्या तरी त्यांच्या गटातील अनेक ग्रामपंचायती हातून निसटले आहे. याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवर होऊ शकतो.