औरंगाबाद: दोघेही अन्यत्र विवाहित असतांना त्यांचे प्रेम जुळून आले. या विवाहबाह्य संंबंधांतून त्या प्रेमीयुगुलाने एकाच साडीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. ही सनसनाटी घटना हर्सूल परिसरातील एकतानगरात मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास समोर आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. यातील प्रेयसीच्या मागे तीन मुले व पतीसह अन्य कुटुंबिय आहेत. तर प्रियकराच्या मागे पत्नी व अन्य कुटुंब आहे. ( lover man n women commit suicide leaving their children, Husband and wife behind)
याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सीमा ईश्वर कांबळे (३५, रा.एकतानगर, हर्सूल) आणि सचिन गंगाधर पेटारे (२७, रा.एन १३, वानखेडेनगर, हर्सूल ) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, सीमा कांबळे आणि सचिन हे जवळच्याच वसाहतीत राहत असल्याने एकमेकांना ओळखत होते. सचिनचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. तर सीमाला १२ व ६ वर्षाच्या मुली आणि ९ वर्षाचा मुलगा अशी ३ अपत्य आहेत. तीचा पती खाजगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. सीमा आणि सचिन यांचे गेल्या काही वर्षापासून मित्रत्वाचे संबंध होते. लग्न झाल्यानंतरही त्याचे सीमाच्या घरी येणेजाणे होते. मंगळवारी सकाळी सीमाचा पती कामावर गेला होता. तर सचिनही जेवणाचा डबा घेऊन कामावर जातो, असे घरी सांगून निघाला.
काम न मिळाल्याने तो सीमाच्या घरी गेला. तेव्हा सीमाची तिन्हे मुले घरी होती. सचिन तेथे गेल्यावर दोन्ही मुली आणि मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेले. सीमा आणि सचिन यांनी अचानक खोलीचे दार आतून बंद करून घेत छताच्या हुकाला साडी बांधली. साडीच्या एका पदराने सीमा तर दुसऱ्या पदराने सचिनने गळफास घेऊन आत्महत्या केली. ११.३० वाजेच्या सुमारास सीमाचा मुलगा आणि मुली घरी परतल्या तेव्हा त्यांना घराचे दार आतून बंद दिसले. आवाज देऊन आणि दार ठोठावूनही आई दार उघडत नसल्याने त्यांनी रडतच घरमालक आणि शेजाऱ्यांना ही बाब सांगितली. घरमालकाने दार ठोठावून पाहिले मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. दाराच्या फटीतून आत पाहिले असता सीमा आणि सचीन लटकलेले दिसले. त्यांनी सीमाच्या पतीला आणि हर्सूल पोलिसांना फोन करून तेथे बोलावून घेतले. पोलीस उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ, उपनिरीक्षक गिरी, हवालदार पालवे, काटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दार तोडले असता सीमा आणि सचिन यांनी एकाच साडीला गळफास घेतलेला दिसला. त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
सीमाच्या मुलांनी फोडला हंबरडासीमा आणि सचिन यांनी गळफास घेतल्याचे घरमालकाने पाहिल्यानंतर त्यांनी आणि शेजाऱ्यांनी तिच्या मुलांना तेथून दुसरीकडे नेले. मात्र काहीतरी अघटीत घडल्याचे मुलांच्या लक्षात आले व त्यांनी हंबरडा फोडला. काही वेळाने वडिल व नातेवाईकांसोबत घाटीत आलेल्या एका मुलाने वडिलांना बिलगून हंबरडा फोडला. यामुळे वातावरण गंभीर बनले होते.