छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणाऱ्या ७०० आणि १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या तीन ठिकाणी फुटल्या. दोन ठिकाणी जलवाहिनी बंद न करता लिकेज बंद करण्यात आले. तिसऱ्या ठिकाणच्या लिकेजसाठी ७०० मिमीची जलवाहिनी दोन तास बंद ठेवावी लागली. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा महापालिकेने केला. वाढत्या तापमानामुळे शहरात पाण्याची मागणी तीन पटीने वाढली आहे. नागरिक मोठ-मोठ्या पाण्याच्या मोटारी लावून पाणी घेत असल्याने प्रत्येक गल्लीतील शेवटच्या टोकापर्यंत पाणीच मिळत नसल्याच्या तक्रारीही प्रचंड वाढल्या आहेत.
दर दोन ते तीन दिवसाला शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने विघ्न येते. सोमवारी सकाळी चितेगाव येथे १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह निखळला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आकाशात उडू लागले. घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाने धाव घेतली. जलवाहिनी बंद न करता व्हॉल्व्ह बंद करण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वीही झाला. त्यानंतर ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर ढाकेफळ येथे एअर व्हॉल्व्ह निखळला. हे कामही मनपाने जलवाहिनी बंद न करता केले. दुपारी ढोरकीन येथे ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील जुना एक जॉइंट निखळला. जलवाहिनी सुरू ठेवून हे काम करणे अशक्यप्राय ठरत असल्याने दोन तासासाठी उपसा बंद करून सायंकाळी उशिरापर्यंत काम पूर्ण करण्यात आले.