संतोष मगरतामलवाडी : परीक्षा संपल्यानंतर शाळेतला किलबिलाट थांबला आहे. अनेकांनी आजी-आजोबा, मामा-मामीकडे सुटीसाठी जाणे पसंत केले आहे, तर अनेकजण आई-बाबांसमवेत पर्यटनस्थळी सुटीची मजा घेत आहेत; मात्र यमगरवाडीतील एकलव्य आश्रमशाळेत असलेल्या त्या दोन विद्यार्थ्यांच्या नशिबी हे सुख नाही. आई-वडिलांविना पोरके असलेल्या तीन बहिणींना मावशी मिळाली आहे. मात्र दोघे विद्यार्थी जवळचे असे कोणी नसल्याने सुटीतही आश्रमशाळेतच आहेत.यमगरवाडी शिक्षण संकुलातील एकलव्य आश्रमशाळेत भटक्या विमुक्त समाजातील मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी संस्था आणि संस्थेतील कर्मचारी सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्यामुळेच याच शाळेतील अनेक विद्यार्थी आज अनेक महत्त्वाच्या हुद्द्यावर काम करीत आहेत. सध्यस्थितीत या शाळेत ३७१ मुले शिक्षण घेत आहेत. परीक्षा संपल्यानंतर यातील बहुतांश मुले आपल्या घर, तसेच नातलगांकडे सुटीसाठी परतले आहेत. मात्र आई-वडिलांसह जवळचे नातेवाईक नसलेल्या रुपाली (वय ३ वर्षे), सोनाली (वय ५ वर्षे) आणि दीपाली (वय ७ वर्षे) या तिन्ही बहिणी सुटीतही आश्रमशाळेतच होत्या. जवळचे असे नातेवाईक नसल्याने जायचे कोणाकडे आणि सुटी सांभाळणार कोण? त्यामुळे या तिघींनीही आपल्याला हक्काचा निवारा दिलेल्या आश्रमशाळेत राहणेच पसंत केले. आश्रमशाळेतील कर्मचारीही या चिमुकल्यांची लेकरांप्रमाणेच काळजी घेतात; मात्र तरीही सुटीत कुठेतरी जावे असे या चिमुकल्यांना वाटणे स्वाभाविकच. ही त्यांची व्यथा पाटोदा (ता. किनवट, जि. नांदेड) येथील देवीसरोजा खंडगावकर यांना समजली. त्यांना या तिन्ही मुली मावशी मानतात. या चिमुकल्यांना खंडगावकर यांनी सुटीसाठी पाटोद्याला नेले आहे. या तिघींसारखीच रामू (इयत्ता सातवी) आणि रतन (इयत्ता सहावी) या दोघांची स्थिती आहे. या दोघांनाही जवळचे असे कोणी नाही. आई-वडिलांच्या पश्चात आश्रमशाळा हेच आज त्यांच्यासाठी हक्काचे घर आहे. आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्या नातलग, पै-पाहुण्यांकडे आनंदाने उपभोगत असताना हे दोघे मात्र आश्रमशाळेतच आहेत. दरम्यान, पाटोद्याला सुटीवर गेलेल्या तिघी बहिणी सुटी संपताच पुढील शिक्षणासाठी यमगरवाडी येथे दाखल होणार असल्याचे संस्थेच्या सूत्रांनी सांगितले.
‘त्या’ दोघांची सुट्टी आश्रमशाळेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2017 11:36 PM