औरंगाबाद : घरातील तरुण मुलाच्या साखरपुड्याची जय्यत तयारी करण्यात सगळे मग्न होते. सर्व खरेदी झाल्यानंतर साखरपुड्याची अंगठी खरेदी करून रात्री सर्व कुटुंबीय आनंदात झोपले. मात्र सकाळी जेव्हा भावी नवरदेवाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड होताच घरातील आनंदाचे वातावरण दुखात बदलून गेले. शुभम बबन खोसे (२५) असे मृताचे नाव असून ही घटना मंगळवारी ( दि. १७ ) सकाळी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत शुभमचं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं. तो कंत्राटदार म्हणून काम करत असे. चित्तेपिंपळगाव येथील राहत्या घराच्या तळ मजल्यावरच त्याचं कार्यालय होतं. काही दिवसांपूर्वीच नात्यातल्या मुलीसोबत त्याचे लग्न ठरले होते. येत्या रविवारी ( दि. २२ ) शुभंमचा साखरपुडा होणार होता. साखरपुड्याच्या तयारीसाठी घरच्यांची लगबग सुरु होती. सोमवारी ( दि. १६ ) संध्याकाळी नातेवाईकांनी शुभमच्या साखरपुड्याची अंगठी व इतर दागिने खरेदी केले. साखरपुडा असल्यानं घरात सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. शुभमने रात्री घरच्यांसोबत जेवण केलं व त्याच्या खोलीत झोपायला गेला. मंगळवारी सकाळी शुभम आपल्या खोलीतून बऱ्याच वेळ बाहेर आला नसल्याने नातेवाईकांनी त्याला आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. खोलीच्या खिडकीच्या फटीतून डोकावून पाहिलं असता शुभमने पंख्याला गळफास घेतल्याचं धक्कादायक चित्र नातेवाईकांना दिसलं. यानंतर नातेवाईकांनी लागलीच खोलीचा दरवाजा तोडून शुभमला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत आहेत. लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात होण्यापूर्वीच शुभमनं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला याचा अद्याप उलगडा होऊ शकले नाही.