ससेहोलपट : जेथे तक्रारदार गेला त्याच ठिकाणी गुन्हा नोंदविला पाहिजे
राम शिनगारे
औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घटना घडलेली नाही, त्यामुळे तक्रारदाराला विविध पोलीस ठाणे फिरावे लागल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. मात्र, कायद्यातील तरतुदीनुसार तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला, त्याठिकाणी गुन्हा दाखल करून संबंधित पोलीस ठाण्याला वर्ग करण्याचा नियम आहे. मात्र, या नियमांना सर्रासपणे हरताळ फासण्यात येत असल्याचे विविध घटनांवरून दिसते.
घटना घडल्यानंतर नागरिक तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेत असतात. मात्र, तांत्रिकदृष्ट्या गुन्हा घडलेले ठिकाण दुसऱ्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. अनेकवेळा घटना दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घडते. मात्र, घटनेची सुरुवात कोठून झाली यावर गुन्हा नोंदविण्यात येतो. त्यासाठी घटना घडलेल्या पोलीस ठाण्यातच पोलीस पाठवितात, असे प्रकार वारंवार घडत आहेत.
आकडेवारी
शहरातील पोलीस ठाणे : १८ (एक सायबर ठाणे)
पोलीस अधिकारी : ४०० पेक्षा अधिक
पोलीस कर्मचारी : ३१३२
अशी आहेत उदाहरणे
१) चार ठाण्यांत फिरविले
२६ ऑगस्ट रोजी स्मार्ट सिटी बसमध्ये वाहक असलेल्या प्रतिभा काशीनाथ दिवटे-एंडोले या दुपारी २ ते रात्री ९ वाजेदरम्यान ड्युटीवर होत्या. रात्री शेवटची फेरी असताना त्यांना एका प्रवाशाने विनाकारण हुज्जत घालत शिवीगाळ केली. प्रवासी अधिक त्रास देत असल्यामुळे बस सिडको पोलीस ठाण्याच्या टी.व्ही. सेंटर येथील चौकीसमोर थांबविली. त्याठिकाणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी सिटी चौक पोलीस ठाण्यात पाठविले. तेथून बेगमपुरा ठाण्यात तक्रार दिली. मात्र, घटनेची सुुरुवात क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्यामुळे तिकडे पाठविले. तक्रारदार वाहकाला रात्री नऊ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत केवळ तक्रारीसाठी चार पोलीस ठाणे फिरावे लागले होते.
२) अत्याचार झालाच नसल्याचा जबाब
महिनाभरापूर्वी नांदेडहून रुसून आलेल्या एका विवाहितेवर रिक्षावाल्याने गोड बोलून, तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्याचार केले. तेथून रिक्षाचालकाने विवाहितेला वाळुज येथे घेऊन जात एका ठिकाणी रूम भाड्याने घेऊन त्याठिकाणी सहमतीने चार दिवस सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर तो रिक्षाचालक गायब झाला. यातून अत्याचार झालेल्या विवाहितेने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात जात सामूहिक अत्याचार झाल्याचे सांगितले. त्याठिकाणी पोलिसांनी पीडितेकडून सर्व वृत्तांत ऐकून घेतला. त्याविषयीची नोंद ठाण्यात केली आणि घटनेची सुरुवात क्रांती चौक पोलीस हद्दीत झालेली असल्यामुळे विवाहितेला पोलिसांच्या गाडीत बसवून क्रांती चौक पोलीस ठाण्यात पाठविले. यात दोन-अडीच तासांचा वेळ गेला. सगळा प्रकार पाहून विवाहितेने महिला समितीसमोर जबाब देताना माझ्यावर अत्याचार झाले नाहीत, असा जबाब देत माझ्या घरी सोडा, अशी विनंती केली. त्यामुळे गुन्हा नोंदच झाला नाही.
कोट,
हद्दीबाहेरील असेल तर गुन्हा नोंद होतो
शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्यातील अंतर कमी असते. पोलीस अधिकारी एकमेकांशी संपर्क साधून गुन्हा नोंदवितात. त्यामुळे हद्दीचा प्रश्न निर्माण होत नाही. त्याचवेळी बाहेरील जिल्ह्यातील घटना असेल आणि आपल्या हद्दीत तक्रार दिलेली असेल तर तत्काळ तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्यात येतो. त्यात कोठेही दिरंगाई केली जात नाही.
- रवींद्र साळोखे, सहायक पोलीस आयुक्त