सोयगाव : औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचे थैमान सुरू झालेले आहे. त्यामुळे औरंगाबादकरांसाठी सोयगाव तालुक्यातील गावांच्या सीमा सील करण्याचा निर्णय ग्रामपातळीवर घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सोयगाव तालुका दूर असून, तालुक्यात दुसऱ्या लाटेचा शिरकाव होऊ नये म्हणून औरंगाबाद शहरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना कोविड तपासणी प्रमाणपत्र असल्याशिवाय सोयगाव तालुक्यातील गावांमध्ये प्रवेश न देण्याच निर्णय घेतला आहे. गावागावांतील नागरिकच यासाठी सज्ज झाले आहेत. दुसऱ्या लाटेला गावाच्या सीमेवरच रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
सोयगाव तालुक्यात उपचारासाठी नाही सुविधा
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेसाठी सोयगाव तालुक्यात एकही कोविड केंद्र कार्यान्वित नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा संसर्ग झाल्यास रुग्णांना खासगी हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही. जरंडी येथील कोविड केअर सेंटर धूळ खात उभे आहे. एकेकाळी तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या जरंडी कोविड केंद्राला मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे घरघर लागली आहे. औरंगाबाद शहरातून सोयगाव व तालुक्यातील गावांमध्ये नोकरीनिमित्त येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर निर्बंध घालावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे, तर हेच लोक कोरोना संसर्ग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत.