छत्रपती संभाजीनगर :खेळता खेळता लिफ्ट मध्ये गेल्या नंतर दरवाजा अचानक सुरू झाल्याने १३ वर्षाच्या साकिब सिद्दीकी इरफान सिद्दीकी या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. कटकट गेट परिसरात १४ मे रोजी रात्री साडेदहा वाजता हि घटना घडली होती. त्याप्रकरणात आता सदर लिफ्ट चारही बाजुने विनासंरक्षण असून जिना व लिफ्ट उघडी आहे. त्यामुळे याला इमारत मालक व लिफ्ट बसवणाऱ्यांना जबाबदार धरले असून त्यांच्यावर साकिब च्या मृत्यूस जबाबदार धरत जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैद्राबादच्या कंपनीत बीम अभियंते असलेल्या मोहंमद इरफान सिद्दीकी (४२) पत्नी, मुलगी व मुलासह हैद्राबादला गेले होते. मोठा मुलगा साकिब अहेमदला त्यांनी त्या दरम्यान आज्जीकडे ठेवले होते. १४ मे रोजी साकिब रात्री साडेदहा वाजता अपार्टमेंट मध्ये खेळत असताना लिफ्टमध्ये गेला होता. मात्र, त्याच दरम्यान अचानक लिफ्ट अचानक सुरू झाली आणि बेसावध असलेल्या साकीबचा गळाच दरवाजात अडकला गेला. ही घटना इतकी भीषण होती की, यात साकिबचा अर्धा अधिक गळा कापला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकिबच्या वडिलांच्या तक्रारीवरुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. लिफ्टची पाहणी केली असता जीन्याच्या चारही बाजुला लिफ्टला कुठलेही संरक्षण नसून लिफ्ट उघडी आहे. ग्राऊंड फ्लोअर वर जेथे लिफ्ट समाप्त होते तेथे कोणत्याही प्रकारची स्प्रींग, शॉकअप बसवलेले नाही. या निष्काळजीपणाला इमारत मालक काजी सलीम मोहीयोद्दीन सिद्दीकी, ७१ व लिफ्ट बसवणारा हितेश मधुकांत लाडाणी, ४१, रा. गुजरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक अशोक भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हारुन शेख याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.