पैठण : आपेगाव ( ता. पैठण) येथील यात्रेसाठी फुलविक्रेत्या आई सोबत आलेल्या १६ वर्षीय मुलाचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू झाला. महादेव जालिंदर दहिफळे वय १६ रा. मोहटा ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर असे या युवकाचे नाव आहे. दरम्यान मुलाच्या नातेवाईकांनी त्याचे शव अंत्यविधीसाठी मुळगावी नेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव येथे आज कार्तिकी काला यात्रा मोठ्या प्रमाणावर भरते. छोटे मोठे व्यापारी व पानफूलाची विक्री करणारे देखील मोठ्या संख्येने बाहेर गावाहून आपेगाव येथे येतात. महादेव जालिंदर दहिफळे ( वय १६ रा. मोहटा ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर ) हा युवक आपल्या आई व नातेवाईका सोबत आपेगाव येथे आला होता. मंदिराच्या लगत असलेल्या गोदावरीच्या घाटावर स्नान करण्यासाठी तो गेला परंतू बराच वेळ झाल्यानंतरही तो परत आला नाही. यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध केली असता गोदावरी नदीच्या घाटावर त्याचे कपडे आढळून आले. आपेगाव ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा मृतदेह पाण्यातून शोधून बाहेर काढण्यात आला. सदर मुलाच्या आईने व नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार देऊन मृतदेह अंत्यविधीसाठी मुळ गावी घेऊन गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.