औरंगाबाद : संपत्तीच्या वादातून नातेवाईकांनी वडिलांचा खून केल्याची बतावणी करणारा फिर्यादी मुलगाच जन्मदात्याचा खूनी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे २८ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या या खूनप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली.
ज्ञानेश्वर काशीनाथ वाघमारे(४२,रा.राजनगर,मुकुंदवाडी)असे संशयित आरोपीचे मुलाचे नाव आहे. आरोपी हा नाशिक येथे बांधकाम मजूर म्हणून काम करतो आणि तेथेच दुसर्या पत्नीसह राहतो. त्याला एक बहिण असून ती जालना येथे राहते. जालना जिल्ह्यातील एका गावात त्यांच्या वडिलांच्या नावे वडिलोपार्जित तीन एकर जमीन आहे. आरोपी ज्ञानेश्वर ला पैशाची अडचण असल्याने त्याला ती जमीन विकायची होती. मात्र त्याच्या वडिलांचा जमिन विक्री करण्यास विरोध होता. त्याचा साडू हा राजनगर येथे राहतो.तर त्याची पहिली पत्नी एस.टी. महामंडळामध्ये वाहक पदी कार्यरत असून तिचा भूखंडही राजनगर येथे आहे. राजनगर येथे त्याचे नातेवाईक परमेश्वर दोंडगे, हरिभाऊ शिंदे, सतू शिंदे आणि संजीवनी यांनी जमिनीच्या वाटणीवरून केलेल्या मारहाण बेशुद्ध पडल्याने आपण त्यांना घाटीत दाखल केले, असे नमूद करीत आरोपींविरोधात मुकुंदवाडी ठाण्यात फिर्याद नोंदविली होती.
उपचारादरम्यान जखमी काशीनाथ यांचा मृत्यू झाला. यामुळे पोलिसांनी खूनाचे कलम लावून तक्रारदार यांनी नावे दिलेल्या संशयितांची आणि तक्रारदार ज्ञानेश्वरची विचारपूस केली. मृतावर अंत्यसंस्कार केल्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वरला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. शिवाय घटना जेथे झाली तेथील शेजार्यांचा पोलिसांनी जबाब नोंदविला. तेव्हा मारहाणीची कोणतीही घटना तेथे झाली नसल्याचे लोकांनी सांगितले. शिवाय तक्रारदार आणि संशयितांच्या मोबाईल कॉल डिटेल्सची तपासणी आणि अन्य तांत्रिक पुरावा तपासला असता आरोपी खोटं बोलून पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे निष्पन्न झाले. नंतर त्यास पोलिसी खाक्या दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली,अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राहुल खटावकर यांनी दिली.