औरंगाबाद : पोलिसांनी ठरविल्यास काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय सोमवारी पहाटे आला. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे रात्रगस्तीवर असताना १५ वर्षांचा मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती त्यांना कळली. त्यांनी रेल्वे पोलीस स्थानकात मध्यरात्री धाव घेत पहाटेपर्यंत सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात मुलगा मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये चढताना दिसला. त्यामुळे प्रत्येक रेल्वेस्थानकावरीलपोलिसांकडे मुलाचे छायाचित्र पाठवले. मुलगा सकाळी ६ वाजता मुंबईतील सीएसटी स्थानकात उतरताच रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
निरीक्षक गौतम पातारे हे रविवारी रात्रगस्तीवर होते. ते सातारा ठाण्यात पोहचले तेव्हा तेथे १५ वर्षांचा मुलगा घरातून निघून गेल्याची तक्रार देण्यासाठी पालक आले होते. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाने गोल्डन कलरचा पेन घेण्यासाठी पाकिटातून १०० रुपये काढून घेतले म्हणून त्याच्यावर वडील रागावले. त्यांनी मुलाला मारहाण केली. मी इतके पेन आणतो तरीही तू पाकिटातून पैसे का घेतो, असा सवाल त्यांनी केला होता. यामुळे मुलगा घरातून निघून गेला. कुटुंबातील सदस्यांना वाटले परत येईल. रात्रीचे ९ वाजले तरी मुलगा घरी आला नाही. त्यामुळे घाबरलेले नातेवाईक रात्री उशिरा सातारा पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांची भेट निरीक्षक पातारे यांच्याशी झाली. त्यांनी पालकांकडून मुलाचा पासपोर्ट फोटो घेतला आणि थेट रेल्वे स्थानक गाठले.
स्थानकातील सर्व सीसीटीव्ही तपासण्याचा निर्णय घेतला. रेल्वे कर्मचाऱ्याला विनंती करुन मदतीसाठी बोलावले. पहाटे ४.३० वाजेपर्यंत सर्व फुटेज तपासल्यावर मुलगा मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये चढताना दिसला. मुलाची माहिती औरंगाबाद रेल्वेस्थानक ते मुंबईतील सीएसटीपर्यंतच्या सर्व रेल्वे पोलिसांना पाठवली. मुलगा स्थानकात तर उतरला नाही ना ? याची पोलिसांना खात्री करण्यास लावले. शेवटी पहाटे ५.३० ते ५.४५ वाजेच्या सुमारास सीएसटीला पोहोचलेल्या नंदीग्राम मधून मुलगा उतरताच रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि सकाळी ६ वाजताच ही शुभवार्ता पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना कळविली. या घटनेची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना होताच त्यांनीही पातारे यांच्या तपासाचे कौतुक केले आहे.