- बापू सोळुंके
औरंगाबाद : चुकीच्या मित्र-मैत्रिणींची संगत, कुमार वयातील प्रेम आणि व्यसनाधीनतेसह अन्य कारणांमुळे १८ वर्षांखालील मुले घर सोडून जात असल्याचे समोर आले आहे. १८ वर्षांखालील मुलगा हरवल्यानंतर पोलिसांकडूनअपहरणाचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध घेतला जातो. अशा प्रकारे वर्षभरात पळून गेलेल्या ९७ मुला-मुलींपैकी ९३ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
१८ वर्षांखालील मुले, मुली गायब झाल्याची तक्रार प्राप्त होताच तातडीने अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. वर्षभरात शहरातील तब्बल ९७ अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे गुन्हे नोंद झाले होते. ० ते ५ वयोगट, ६ ते १२ वयोगट आणि १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या अपहरणाची वेगवेगळी कारणे असल्याचे समोर आले आहेत. पाच वर्षांखालील मुला-मुलींचे एक तर त्यांचे अपहरण होते किंवा मुलगी नको म्हणून जन्मदातेच तिला सोडून देतात. ६ वर्षांखालील बालक ांच्या बाबतीत रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे आई-वडील बस अथवा रेल्वेत बसले आणि बालक खालीच राहिला अथवा बालक, बालिका चुकून रेल्वेत बसल्याने हरवल्याचा प्रकार घडतो. ज्या बालकांना चांगले बोलता येते अथवा त्यांना त्यांच्या आई-बाबांचे नाव आणि घराचा पत्ता सांगता येतो, अशी बालके पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांना परत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करणे शक्य होते. मात्र, ज्या बालकांना काहीच समजत नाही त्यांना बालगृहात ठेवले जाते. शाळेला दांडी मारून वाईट मित्रांच्या संगतीला लागलेली मुले घर सोडून निघून जाण्याच्या घटना घडतात. त्यांना घरी जायचे नसल्याने पोलिसांना सापडल्यानंतरही ती मुले त्यांची नावे आणि पत्ते सांगत नाहीत.
कुमार वयात पळून जाण्याचे प्रमाण अधिक१५ ते १८ वयोगटातील मुले-मुली हे प्रेमप्रकरणातून घर सोडून प्रियकर, प्रेयसीसोबत पळून जातात. या वयातील पळून जाणाऱ्या मुला-मुलींची संख्या अधिक आहे. अल्पवयीन मुलींना सज्ञान तरुण पळून नेतात, अशा वेळी त्यांच्याविरोधात गुन्हा नोेंद झाल्यानंतर त्यांना अटक होते.
बंधन नको म्हणून मुले-मुली सोडतात घर, अनाथाश्रम१२ ते १८ वयातील ज्या मुला-मुलींना आई-वडील आणि शाळेचे नियम म्हणजे बंधने वाटतात, ती मुले-मुली घरातून पलायन करतात. त्यांना शोधून घरी आणल्यानंतर ती पुन्हा पळून जातात, अशा अनेक घटनांचा पोलिसांनी तपास केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
सोशल मीडियाची होते मदत
अल्पवयीन मुले-मुली बेवारस अवस्थेत आढळले तर त्यांना परत त्यांच्या आई-बाबांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. स्वत:हून घरातून निघून गेलेली १५ वर्षांखालील मुले-मुली आई-बाबांना फोन करून आमचा शोध घेऊ नका, असे कळवितात, तर काही संपर्कही साधत नाहीत. हरवलेल्या अथवा पळून गेलेल्या अल्पवयीन मुले-मुली रेल्वेप्रवासात अथवा रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे संशयितरीत्या आढळल्यास त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जाते आणि त्यांना परत त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यासाठी पोलीस आणि चाईल्डलाईनकडून प्रयत्न केले जातात.- अन्नपूर्णा ढोरे, समन्वयक, चाईल्डलाईन सेंटर, औरंगाबाद