लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुलांना माध्यमिकच्या मुख्याध्यापिकेने फरफटत बाहेर काढल्याने एका मुलाचा हात निखळला, तर काही मुलांच्या हातापायाला व पोटावर दुखापती झाल्या. त्यामुळे पालकांनी शुक्रवारी सकाळी शाळेतील मुख्याध्यापिका व संचालकांना घेराव घालून जाब विचारला. दरम्यान याप्रकरणी पालकांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, शाळेतील प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या दोन मुख्याध्यापकांच्या अंतर्गत वादाचे हे पडसाद आहेत, अशी चर्चा यावेळी शाळेत ऐकायला मिळाली. शिवाजीनगर सिडकोची १२ व्या योजनेतील कलावती चव्हाण हायस्कूलमध्ये गुरुवारी सकाळी इयत्ता १० वीच्या मुलांची शाळा सुटली. त्यानंतर या विद्यार्थ्यांचा एक्स्ट्रा क्लास घेण्यासाठी मुख्याध्यापिका संध्या काळमकर यांनी या विद्यार्थ्यांना सहावीच्या वर्गात बसविले. दोन सत्रांमध्ये भरत असलेल्या दुपारच्या सत्रातील विद्यार्थी आले. त्यावेळी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नव्हती. यावेळी जागेवरून विद्यार्थ्यांत गोंधळ निर्माण झाला. दरम्यान मुख्याध्यापिका काळमकर यांनी आकाश विष्णू साबळे या विद्यार्थ्याचा हात धरून वर्गाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आकाशचा उजवा हात खुब्यापासून निखळला. अमोल बापू चव्हाण, पवन साळुंके यांच्यासह दहा-पंधरा मुले व मुलींनाही याच प्रकारे वर्गाबाहेर काढल्याने अनेकांना किरकोळ दुखापत झाली. शुक्रवारी पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापिका संध्या काळमकर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिक्षक, मुख्याध्यापकांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाचाबाची झाली. गोंधळ वाढल्याने स्थानिकांनी गर्दी केली. त्यानंतर पालकांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा हात मोडला
By admin | Published: July 01, 2017 12:46 AM