छत्रपती संभाजीनगर : संविधानाने दिलेल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर करीत सर्व मतदारांनी मतदान करावे, कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मत द्या, पण मतदान करा... कारण, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, अशी मतदार जनजागृतीच यावेळी भगवान परशुराम जन्मोत्सवातून करण्यात येणार आहे. यावेळी ‘मतदार जनजागृती अभियान’आणि ‘महिला-बालकांमध्ये आरोग्य जनजागृती अभियान’ हे दोन मुख्य अभियान हाती घेतल्याची माहिती प्रकल्पप्रमुख गीता आचार्य यांनी दिली.
ब्राह्मण समाज समन्वय समितीच्या वतीने समाजातील महिला संघटनांच्या हाती शोभायात्रेचे संपूर्ण नियोजन सोपविण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत प्रकल्पप्रमुख अनुराधा पुराणिक यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजात सुमारे अडीच लाख मतदार आहेत. त्यांच्यात मतदानाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी ४ ठिकाणी रक्तदान शिबिर, दंत तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. महिलांसाठी क्रिकेट स्पर्धाही असून त्यात सात संघ सामील झाले होते. शुक्रवारी १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी ७ वाजता क्रांती चौक येथून वाहन रॅली सकाळी ८ वाजता औरंगपुऱ्यातील भगवान परशुरामस्तंभाचे पूजन व सायंकाळी ५ वाजता राजाबाजार येथून मुख्य शोभायात्रा असेल. यात वेगवेगळ्या रथांत माई महाराज, अंबरीश महाराज व चार वेदाचार्य असतील. सजीव, निर्जीव देखावे, मतदार जनजागृती व ४ ढोलपथक यात असतील. ब्राह्मण समाज समन्वय समिती अध्यक्ष मिलिंद दामोदरे, आर. बी. शर्मा, धनंजय पांडे, संजय मांडे, आनंद तांदूळवाडीकर, माणिक रत्नपारखी, लक्ष्मीकांत जयपूरकर, अनिल खंडाळकर, अभिषेक कादी, अनिल मुळे, डॉ. माधुरी पुराणिक, थेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व जातीधर्माच्या लोकांना आवाहनप्रकल्पप्रमुख विजया अवस्थी यांनी सांगितले की, भगवान विष्णूचे सहावे अवतार भगवान परशुराम यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केले. भगवंतांचे कार्य कोणत्या एका समाज, धर्मापुरते मर्यादित नव्हते. यामुळे भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या शोभायात्रेत सर्व जातीधर्मियांनी सामील व्हावे.