संतोष हिरेमठऔरंगाबाद : औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात एका ब्रेनडेड महिलेच्या अवयवदानाची प्रक्रिया सुरु आहे. या महिलेच्या अवयवदानाने किडनी, यकृताची गरज असलेल्या रुग्णांच्या आयुष्यात दिवाळीत खऱ्या अर्थाने ‘प्रकाश’ मिळणार आहे.
जळगाव येथील ३८ वर्षीय सीमा राजेश भगत यांचा १६ ऑक्टोबर रोजी अपघात झाला होता. त्यानंतर जळगाव येथेच खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु होते. त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार सुरु असताना त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले.
यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना अवयदानासंदर्भात माहिती देण्यात आली. कोणाला तरी नवीन आयुष्य मिळेल, या भावनेने पती राजेश भगत आणि त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ अवयवदानाला होकार दिला. ‘झेडटीसीसी’चे अध्यक्ष आणि उपअधिष्ठाता डाॅ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली एमजीएम रुग्णालयात अवयवदानाची प्रक्रिया सुरु आहे.