नजीर शेख, प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी असे बिरुद मिरविणार्या औरंगाबादचे ब्रँडिंगच झाले नाही. या ऐतिहासिक जिल्ह्यात खर्या अर्थाने ‘अतिथी देवो भव’ची संस्कृती रुजलीच नाही. फाईव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेल वगळता, स्थानिक नागरिकांनी पर्यटन उद्योगाने अख्खे गाव समृद्ध होऊ शकते, असा विचार कधी केलाच नाही. परिणामी, पर्यटनात विविधतेने नटलेला या शहरात पर्यटक थांबतच नाहीत. कोकणच्या धर्तीवर पर्यटनात ‘औरंगाबादचा ब्रँड’ निर्माण करण्यासाठी यंग ब्रिगेडने अग्रेसिव्ह होण्याची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी आयोजित ‘टुरिझम कॉन्वलेव्ह’ कार्यक्रमात तत्कालीन राज्याचे पर्यटनमंत्री विजयकुमार गावित यांनी औरंगाबाद महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून अधिकृतरीत्या घोषणा केली होती. याशिवाय औरंगाबाद, अजिंठा, वेरूळ व लोणार यांचा समावेश असलेल्या ‘औरंगाबाद हेरिटेज कॉरिडोर’ची घोषणाही त्यांनी केली होती. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा समृद्ध आहे. मात्र, पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी कोकणात जसे घराघरांतून प्रयत्न होतात तसेच प्रयत्न औरंगाबाद जिल्ह्यात झाल्यास पर्यटन उद्योगात क्रांती होेऊ शकते. यासाठी संपूर्णपणे शासनाच्या भरवशावर गाडी न हाकता, औरंगाबादकरांनी स्वत: उद्योगात उडी घेण्याची गरज आहे. प्रत्येक पर्यटक फाईव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेलमध्ये राहू शकत नाही. याकरिता यंग ब्रिगेडने नोकरीऐवजी ‘अतिथी देवो भव’ म्हणत पर्यटकांना लज्जतदार जेवणापासून, निवासापर्यंत सुविधा पुरविल्यास पर्यटनात ‘औरंगाबादी ब्रँड’ निर्माण होऊ शकतो. राज्य शासनाचे दुर्लक्ष अजिंठा, वेरूळसह औरंगाबाद शहरातील पर्यटनस्थळांच्या विकासाकडे राज्य सरकारने आतापर्यंत गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसते. औरंगाबादसह वेरूळ, खुलताबाद, म्हैसमाळ, शूलिभंजन या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे राज्याच्या अर्थसंकल्पात गेल्या अनेक वर्षांपासून वाक्य असते. मात्र, आर्थिक तरतुदीच्या पातळीवर राज्य शासनाने पर्यटन राजधानीसाठी भरीव तरतूद केल्याचे दिसत नाही. त्यामुळे पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा निर्माण करता आल्या नाहीत. पर्यटन ब्रँड 1 देशाच्या पातळीवर विचार केला तर जम्मू- काश्मीर, राजस्थान, केरळ, हिमाचल प्रदेश तसेच धार्मिक स्थळांच्या बाबतीत उत्तर प्रदेश तसेच उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ, केदारेश्वर, हरिद्वार, प्रयाग, वाराणसी आदी स्थळांमुळे धार्मिक स्थळांच्या बाबतीत एक ब्रँड निर्माण झाला आहे. 2 त्या-त्या प्रदेशातील वैशिष्ट्यांचा या ब्रँडमध्ये समावेश होऊ शकतो. राजस्थानमध्ये पोशाखापासून ते आहारापर्यंत केवळ राजस्थानी ‘कल्चर’ डोकावते आणि हाच राजस्थानी ब्रँड म्हणून लोकप्रिय आहे. याचप्रमाणे काश्मिरी संस्कृती आणि तेथील आदरातिथ्य यामुळे काश्मीरचा देशात नंबर एकचा ब्रँड निर्माण झाला आहे. 3 महाराष्टÑाचा विचार केला तरी आपल्याकडे कोकणी, मालवणी, कोल्हापुरी, असे ब्रँड निर्माण झाले आहेत. त्या-त्या भागातील पर्यटन/धार्मिक स्थळांबरोबच तेथील खाद्यसंस्कृती, सांस्कृतिक वारसा, कलाकुसर, कौशल्ये याचा समावेश त्यामध्ये होतो. 4 मात्र, पर्यटनाची राज्याची राजधानी असलेल्या व युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत अजिंठा आणि वेरूळचा समावेश असतानाही केवळ ब्रँड निर्माण झाला नसल्याने किंवा जाणीवपूर्वक केला नसल्याने पर्यटनाच्या दृष्टीने आपण मागे पडत चाललो आहोत. ‘येवा कोकण आपलाच आसा’ हे वाक्य जसे प्रसिद्ध झाले तसे काही आपल्याकडे दिसत नाही. प्रसिद्धीची आवश्यकता औरंगाबादचा खास पर्यटन ब्रँड निर्माण करण्याबरोबरच त्याची राज्याच्या संपूर्ण देशभरात जाहिरात होणे आवश्यक आहे. इतर राज्यांतील राजधानीची शहरे तसेच इतर पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाहिरातबाजी होणे आवश्यक आहे. आधुनिक काळात सोशल नेटवर्किंग, वेबसाईट याचाही वापर करता येऊ शकेल. आपल्याकडे सर्व आहे; पण मार्केटिंग नाही, हेच दुखणे आहे. या दुखण्यावर मात करण्याची गरज आहे.
पर्यटनाची राजधानी ब्रँडिंगविना
By admin | Published: June 01, 2014 12:45 AM