संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नव्या विमानसेवा सुरू करून शहराची हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी विमानतळाच्या ‘टेकआॅफ’ला म्हणजे विकासाला सध्या खीळ बसत आहे. इतर विमानतळे विकासाची ‘उड्डाणे’ घेत असताना चिकलठाणा विमानतळावरील सध्याची परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. चिकलठाणा विमानतळावरून स्पाइस जेटची औरंगाबाद- दिल्ली विमानसेवा १ फेब्रुवारी २०१५ पासून बंद करण्यात आली. ३१ जानेवारी २०१५ रोजी शहरातील १८५ प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे रवाना झालेले स्पाइस जेटचे विमान अखेरचे ठरले. हे विमान बंद झाल्यामुळे पर्यटन, उद्योगाला फटका बसला. तर ट्रूजेट कंपनीने २५ जुलै २०१५ पासून औरंगाबाद- हैदराबाद- तिरुपती विमानसेवा सुरू केली. औरंगाबादहून तिरुपतीला जाणाºया बालाजी भक्तांना आणि हैदराबादहून शिर्डीला साई दर्शनासाठी येणा-या भाविकांची या विमानसेवेने मोठी सुविधा झाली.एक विमानसेवा बंद पडल्यानंतर एका विमान कंपनीची भर पडली. परंतु गेल्या अडीच वर्षांत एकही नवीन विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. आता ट्रूजेट कंपनीने पुढील महिन्यापासून आठवड्यातून तीनच दिवस सेवा देण्याचे नियोजन केले आहे. परिणामी हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ होण्याऐवजी घट होत आहे. पूर्वी जयपूर-उदयपूर-दिल्ली विमानसेवाही सुरू होती. या विमानसेवेमुळे मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक शहरात दाखल होत असत. परंतु ही सेवा बंद झाल्याने आग्रा, जयपूर, उदयपूर येथे येणा-या पर्यटकांना औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेटी देता येत नाहीत. परिणामी औरंगाबादेतील पर्यटक संख्येवर परिणाम होत आहे. त्यामुळे विमानसेवेला घरघर लागण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी सावध पवित्रा घेऊन विमानतळाच्या विकासासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त होत आहे.
विमानतळाच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:43 AM