औरंगाबाद : जिल्ह्यातील नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) अंतर्गत सुरू असलेली कामे ठप्प पडली आहेत. जालना रोड, बीड बायपासच्या कामासाठी २७५ कोटींची घोषणा होऊन पाच महिने झाले आहेत, तर औरंगाबाद ते अजिंठामार्गे जळगाव या रस्त्याचे चौपदरीकरण निधीअभावी रखडले आहे. धुळे ते औरंगाबाद या एनएच २११ शिवाय कुठलेही काम सध्या सुरू नाही. औरंगाबाद ते पैठण डीपीआरचे काम बंद पडले आहे.
एमएसआरडीसी आणि पीडब्ल्यूडीकडे वर्ग केलेली कामे गुलदस्त्यात आहेत. राज्य एनएचएआयच्या विभागाला तातडीने दिलेल्या निधीतून जालना रोडचे तात्पुरते मजबुतीकरण करण्यात येणार आहे. ते कामही अजून सुरू झालेले नाही, तर बीड बायपास चर्चेतून गायबच झाला आहे. जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम सध्या बंद पडल्यासारखेच आहे. औरंगाबाद ते अजिंठापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार असून, त्यासाठी तीन टप्प्यात ८५० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे. ऋत्विक एजन्सी या संस्थेकडे त्या कामाचे कंत्राट आहे.
चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी न मिळाल्यामुळे कंत्राटदाराने ते काम सध्या बंद ठेवले आहे. त्या रस्त्याचा केंद्रीय दळणवळण मंत्रालयाकडे वाढीव निधीसाठी दिलेला प्रस्ताव पडून आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नॅशनल हायवे विभागाच्या देखरेखीखाली त्या रस्त्याचे काम आहे. सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असली तरी अंतिम मंजुरी अजून दिलेली नाही. पहिल्या टप्प्यात ३०४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी, तर तिसऱ्या टप्प्यात ३१६ कोटी अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली. ही तरतदू द्विपदरीकरणासाठी करण्यात आलेली आहे. चौपदरीकरणासाठी सध्या तरी तत्त्वत: मान्यता देण्यात आलेली आहे.
सुधारित घोषणेची, कार्यवाही नाहीजालना रोड आणि बीड बायपास या दोन्ही रस्त्यांसाठी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने २७५ कोटी निधी देण्याचे जाहीर केले. बीड बायपाससाठी १२५ कोटी रुपयांचा, तर जालना रोडसाठी १५० अशी २७५ कोटींची सुधारित घोषणा १ जून २०१८ रोजी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्याबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. नोव्हेंबर २०१८ पर्यंत या कामाच्या निविदा निघतील, असा दावा सूत्रांनी केला.