लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याच्या विविध अनुशेषासाठी आॅक्टोबर महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याच्या शक्यतेला तूर्तास ब्रेक लागला आहे. बैठकीबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना विचारले असता ते म्हणाले, वरिष्ठ पातळीवरून अजून काहीही सूचना नाहीत. त्यामुळे सध्या काहीही सांगता येणार नाही.मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिका-यांना अनुशेष, नवीन योजना, मागील वर्षाचे अनुपालन, अनुदान, प्रशासकीय मान्यता, प्रलंबित प्रकरणांबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी सप्टेंबरमध्ये दिले होते.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अनुषंगाने आयुक्तालयात विभागीय आढावा बैठक झाली होती. त्यासोबतच संभाव्य मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, सिंचन, महावितरण, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मंत्रिमंडळ बैठक होण्याचा निर्णय झाला तर तयारी असली पाहिजे. त्या हेतूने विभागीय पातळीवर सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र बैठकीसाठी शासनाने तारीख अजून ठरविलेली आहे. मराठवाड्यातील अनुशेष व नवीन मागण्यांबाबत ठोस अहवाल अजून आलेले नाहीत. मागच्या बैठकीतील निर्णय आणि त्याचे अनुपालन झाले काय, निधी किती आला.मराठवाड्याला गेल्या वेळी झालेल्या घोषणा आणि त्यातून किती प्रमाणात कामे झाली, याचा निश्चित आकडा अद्याप समोर आलेला नाही. शासनाकडून विभागनिहाय घोषणांचे अध्यादेश, प्रशासकीय मान्यता, अनुदान किती मिळाले. याची माहिती सध्या तरी प्रशासनाने खुली केलेली नाही.
मंत्रिमंडळ बैठक होण्याच्या शक्यतेला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:46 AM