औरंगाबाद : पहाडसिंगपुरा येथील रेणुकामातानगर आणि ताजमहाल कॉलनीतील रहिवाशांना हुसकावून तेथील जमीन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मूळ जमीन मालकाच्या ताब्यात देण्यात आली. या कारवाईमुळे भूखंड खरेदी करून तेथे घरे बांधून राहणारी १२६ कुटुंबे बेघर झाली आणि तेथे भूखंड खरेदी करणाऱ्या एकूण ४०० लोकांची फसवणूक झाली. लोकांच्या हिताचा विचार करून आठ दिवसांत तडजोड करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बीबीका मकबऱ्यामागील पहाडसिंगपुरा येथील जमिनीवर रेणुकामातानगर आणि ताजमहाल कॉलनी येथे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी ४०० लोकांनी भूखंड खरेदी केलेले आहेत. यापैकी १२६ भूखंडांवर घरे बांधून नागरिक राहत आहेत. या जमिनीविषयी माधवराव सोनवणे आणि कोरडे कुटुंबामध्ये न्यायालयात खटला सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल मूळ जमीनमालक माधवराव सोनवणे यांच्या बाजूने दिला. सुमारे ४० वर्षे हा खटला चालला. न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने रेणुकामातानगर आणि ताजमहाल कॉलनी येथील रहिवाशांना घरे खाली करायला लावून संपूर्ण जमीन मूळ मालक सोनवणे यांच्या ताब्यात दिली. गतवर्षी ३१ आॅगस्ट रोजी ही कारवाई झाल्यानंतर तेथे अनधिकृत प्लॉटिंग टाक ल्याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक राजू तनवाणी यांच्यासह काही लोकांना अटक केली होती. जमीन मूळ मालकाच्या ताब्यात दिल्यानंतरही तेथील रहिवासी आपली घरे सोडायला तयार नाहीत. ते पुन्हा तेथे जाऊन राहू लागले. यामुळे गेल्या महिन्यात पुन्हा तेथे कारवाई करण्यात आली होती.कष्टाने पै-पै जमा करून भूखंड खरेदी करून तेथे घरे बांधणाऱ्या गरीब नागरिकांची झालेली फसवणूकही नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर याविषयी सकारात्मक तोडगा काढावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी उभयतांना केले होते. ४दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या दालनात माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या उपस्थितीत खाजा मोईनोद्दीन, मूळ मालक माधवराव सोनवणे यांचे वारस प्रभाकर सोनवणे, संतोष सोनवणे, फसवणूक झालेले भूखंडधारक आणि बेघर झालेल्या नागरिकांचे प्रतिनिधी, नगरसेवक नंदकुमार घोडेले, नगरसेवक सचिन खैरे, माजी नगरसेवक गणू पांडे आदींची बैठक पार पडली.या बैठकीत बेघर लोकांच्या हितासाठी सकारात्मक तोडगा काढण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. आठ दिवसांत याबाबत तडजोड प्रस्तावासह पोलीस आयुक्तांना पुन्हा भेटण्याचे ठरल्याचे माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले.
‘त्या’ बेघरांच्या प्रश्नावर आठवडाभरात तोडगा
By admin | Published: October 08, 2016 1:05 AM