औरंगाबाद : महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आवडता नाश्ता म्हणजे कांदे-पोहे. मात्र आता आपल्या पोह्यांच्या आवडीत महागाईचा खडा पडला आहे. यंदा धानचा तुटवडा असल्याने पोह्याचे दर किलोमागे ३ ते ५ रुपयांपर्यंत वाढले आहेत.
इंधन दरवाढीचा फटका हळूहळू प्रत्येक वस्तूच्या दरवाढीतून नागरिकांना बसू लागला आहे. झटपट तयार होणाऱ्या नाश्त्यासाठी पोह्याला प्राधान्य मिळते. शहरात सकाळच्या वेळी अगदी १० रुपयांत प्लेटभर कांदा-पोहे मिळतात. शिक्षणासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांचा नाष्टाही अनेक वेळा कांदा-पोहे हाच असतो. हॉटेल, खानावळी, हातगाडीवाल्यांकडून पोह्याला मोठी मागणी असते. मागील महिन्यात शहरात १५० टन पोहे विक्री झाले. या महिन्यात व्यापाऱ्यांनी ५० टनाने मागणी वाढवून २०० टन पोहे मागविले आहेत. यात ८० टक्के कांदे-पोह्यांचा समावेश आहे.
यासंदर्भात पोह्यांचे होलसेल विक्रेते प्रकाश जैन यांनी सांगितले की, गुजरात, छत्तीसगढ, मध्यप्रदेशातून पोह्यांची आवक होत असते. मागील वर्षी धानचे उत्पादन घटल्याने याचा परिणाम पोह्यांच्या भाववाढीवर झाला आहे. पोह्यांचे दुसरे विक्रेते गणेश लड्डा म्हणाले की, पोह्यांचे भाव क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांनी वधारू न ३७०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहेत. तर किरकोळ विक्रीत ३ ते ५ रुपयांनी भाववाढ होऊन ४८ ते ५० रुपये किलोने पोहे विकले जात आहेत.