संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीचा तो काळ. कोरोनासह अन्य आजारांच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी भटकंती करावी लागत होती. बेडअभावी घरीच थांबण्याची वेळ रुग्णांवर ओढवत होती. अशा वेळी गोरगरीब रुग्णांना सिलिंडरद्वारे घरीच ऑक्सिजन म्हणजे एक प्रकारे प्राणवायूचा श्वास पुरविण्याचे काम औरंगाबादेतील के. के. ग्रुपने केले.
औरंगाबादेत सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. गंभीर रुग्णांना आयसीयू बेड मिळविण्यासाठी रुग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागले. कोरोनासह कोरोना निगेटिव्ह झाल्यानंतरही अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे घरीच ऑक्सिजन सिलिंडर लावण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जात असे. इतर आजारांच्या रुग्णांनाही घरीच ऑक्सिजन देण्याची व्यवस्था करावी लागत होती. गोरगरीब रुग्णांना रोज ऑक्सिजन सिलिंडर घेणे आवाक्याबाहेर होत असल्याची बाब के. के. ग्रुपच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी ऑक्सिजन सिलिंडर विकत घेऊन गोरगरीब रुग्णांना मोफत पुरविण्याचे काम सुरू केले. के.के. ग्रुपचे अध्यक्ष अकील अहमद (हाफिस साहब) यांनी यासाठी पुढाकार घेतला. ज्या रुग्णांना ऑक्सिजन बेड भेटत नव्हते, त्यांना घरी सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरविण्यात आले. त्यासाठी रुग्णाचे आधार कार्ड, नातेवाइकांचे आधार कार्ड घेतले जात होते. उपाध्यक्ष किशोर वाघमारे, सचिव शेख जुनेद, उपसचिव मोहम्मद आसिफ, अल्ताफ शेख, आसिफ खान, इमाम खान, सुलेमान पाशा, आदींनी यासाठी प्रयत्न केले. जवळपास शंभरावर रुग्णांना ऑक्सिजन पुरविले, आता पुन्हा रुग्ण वाढल्याने हे काम पुन्हा सुरू करीत असल्याचे अकील अहमद यांनी सांगितले. त्याबरोबर घाटी रुग्णालयात औषधी, मास्क, सॅनिटायझर, अन्न पुरविण्याचे कामही या ग्रुपने केले.
सुन्न करणाऱ्या घटनेतही मदत
महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना ८ मे २०२० रोजी औरंगाबादमध्ये घडली. रेल्वे रुळांवरून पायी गावाकडे निघताना रुळावर रात्री झोप घेणाऱ्या स्थलांतरित मजुरांना मालगाडीने चिरडल्याने १६ मजूर जागीच ठार झाले. या मजुरांचे मृतदेह विच्छेदनासाठी घाटीत नेण्यासाठी आणि नंतर मृतदेह गावी पाठविण्यासाठी रेल्वे स्थानकाला पोहोचविण्याचे कामही के. के. ग्रुपने केले. या कामाबद्दल पोलीस प्रशासनाने प्रशस्तीपत्रक देऊन ग्रुपचे कौतुक केले.
फोटो ओळ...
के. के. ग्रुपने अशा प्रकारे ऑक्सिजन सिलिंडरद्वारे गाेरगरीब रुग्णांना प्राणवायू पुरविण्याचे काम केले.