सेलू : आयआयटी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी स्वत: बनविलेल्या विमान व हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा सेलू शहरातील विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला़ आकाशाकडे उड्डाण भरणाऱ्या विमानांनी विद्यार्थ्यांच्या हृदयाचा ठोका चुकवला़ ही प्रात्यक्षिके सुरू असताना जि़ प़ शाळेच्या मैदानाला विमानतळाचे स्वरूप प्राप्त झाले़ श्रीराम प्रतिष्ठाणच्या वतीने विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित प्लॅनेट एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले वैमानिक साहित्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मैदानावर २८ जून रोजी करण्यात आले होते़ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ़ संजय रोडगे, तहसीलदार आसाराम छडीदार, प्लॅनेट एज्युकेशनचे अभिषेक पगारे, डॉ़ राम रोडगे, रणजित गजमल, संतोष डख, एस़बी़एच़ बँकेचे व्यवस्थापक मनजित माही, प्राचार्य संजय लहाने, प्रफुल्ल बिनायके, मुख्याध्यापक राम मैफळ, डी. के़ कुलकर्णी, रमेश डख आदींची उपस्थिती होती़ प्लॅनेट एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी स्वत: बनविलेले विमान, हेलिकॉप्टर, रोबोट या साहित्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते़ उद्घाटनच्या वेळी आकाशाकडे झेपावलेल्या विमानाने मान्यवरांवर पुष्पवृष्टी केली़ तसेच रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने तब्बल चार विमानांनी जि़प़ मैदानावरून उड्डान भरताच बच्चे कंपनी हर्षाेल्हासित झाले़ आकाशात झेपावलेले विमान चित्तथरारक प्रात्यक्षिके करत होती़ त्याच वेगाने जमिनीकडे ही विमाने येत असताना चित्रपटातील दृश्यांची आठवण झाली़ विमानाच्या प्रात्यक्षिकानंतर प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे रोबोट तंत्रज्ञान, सौर उर्जा, रोबोट आदी विषयांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली़ यात ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला़ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ़ संजय रोडगे यांनी प्रास्ताविक केले़ दिव्या त्रिपाठी यांनी सूत्रसंचालन केले. मंजुषा कलशेट्टी यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना मिळाली चालना श्रीराम प्रतिष्ठाणने प्लॅनेट टेक्नोफ ेस्ट फ ेस्टीव्हलमध्ये आय आय टीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले विमानांची प्रात्याक्षिके आयोजित केली होती़ त्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे़ तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण ‘वैमानिक शो’ पहाण्यास मिळाला. त्याचबरोबर त्याचे मार्गदर्शनही मिळाले़ याचा लाभ विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात होईल, असा विश्वास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ़ संजय रोडगे यांनी व्यक्त केला़ दरम्यान, विमानाच्या कवायतीमुळे शहरातील विद्यार्थ्यांसह पालकही मैदानाकडे धावले़
बच्चे कंपनीने अनुभवले विमानाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके
By admin | Published: June 29, 2014 11:40 PM