औरंगाबाद : कामांचे बिल काढण्यासाठी गुत्तेदाराकडून २५ हजारांची लाच घेताना गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडले. जवाहरनगर पोलीस ठाण्यात सदरील अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन विभागाने जालन्याचे रहिवासी गुत्तेदार विठ्ठल पुंडलिकराव अक्कनगरे रेड्डी (५१) यांच्यामार्फत सेलू येथे काम केले होते. रेड्डी यांनी औरंगाबाद येथील पहाडे यांचे भारत इलेक्ट्रिकल व अग्रवाल यांचे प्लुटो इलेक्ट्रिकल या दोन एजन्सीमार्फत निविदा भरून काम केलेले होते. काम पूर्ण झाल्यानंतर गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन विभागाकडे ५ लाख ६५ हजार ४६ रुपयांचे बिल राहिले होते. बिलासाठी रेड्डी यांनी कार्यालयात कार्यकारी अभियंता तेजराव राघो सोसे (४७) यांच्याकडे बर्याच चकरा मारल्या. बिल काढण्यासाठी कार्यकारी अभियंता सोसे यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची रेड्डी यांची इच्छा नसल्यामुळे त्यांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. दरम्यान, गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन विभागाचे कार्यालय औरंगाबादेत गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिर रोडवर असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सं. दे. बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उपअधीक्षक प्रताप शिकारे, निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, सीताराम मेहेत्रे, पोलीस कर्मचारी विक्रम देशमुख, संदीप उबाळे, गंभीर पाटील यांनी सापळा रचला. रेड्डी यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना कार्यकारी अभियंता तेजराव सोसे यास रंगेहाथ पकडण्यात आले. मुंबई-औरंगाबादेतील घरांवर छापे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी बरोबर १ वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन कार्यालयात कार्यकारी अभियंता सोसे यास लाच घेताना पकडले. त्याच वेळी पोलिसांनी औरंगाबादेतील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोसे यांच्या संदेशनगर येथील घरावर तसेच मुंबई येथे काळबादेवी परिसरातील घरावर एकाच वेळी छापा मारला.
लाचखोर अभियंत्यास अटक
By admin | Published: May 16, 2014 12:32 AM