लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करून, तुरुंगात न पाठविण्यासाठी पंधरा हजारांची लाच मागणाऱ्या एका पोलीस शिपायावर मंगळवारी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाच मागणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आत्माराम अंभोरे (५६, रा. माऊलीनगर, जालना) असे आहे.या प्रकरणातील तक्रारदाराच्या नातेवाईकावर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात मदत करून, तुरुंगात न पाठविण्यासाठी कॉन्स्टेबल अंभोरे याने तक्रारदारास पंधरा हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती दहा हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने १२ जुलैला केलेल्या पडताळणीत कॉन्स्टेबल अंभोरे याने ३७०० रुपयांची लाच घेऊन उर्वरित सहा हजार ३०० रुपये देणे बाकी असल्याचे तक्रारदारास सांगितल्याचे निष्पन्न झाले. तपासाअंती अंभोरेवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक व्ही.एल. चव्हाण, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशिद, अमोल आगलावे, रामचंद्र कुदर, टेहरे, धायडे, नंदू शेंडीवाले, संदीप लव्हारे, गंभीर पाटील, रमेश चव्हाण, म्हस्के, खंदारे यांनी ही कारवाई केली.
तपासात मदतीसाठी मागितली लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:53 AM