औरंगाबाद: कर्जदाराकडून सव्वा लाख रुपये लाच घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या लोकविकास बॅंकेचा संस्थापक अध्यक्ष तथा माजी उद्योगसंचालक जगन्नाथ खंडेराव जाधव उर्फ जे . के . जाधवसह त्याचा लेखापाल पवार यास न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली .
वैजापूर तालुक्यात किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या तक्रारदार तरुणाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने ८ लाख रुपये कर्ज मंजूर करीत कर्जाची फाईल लोकविकास नागरी सहकारी बॅंकेकडे पाठविली होती . ही फाईल मंजूर करून कर्जाची रक्कम खात्यात वर्ग करण्यासाठी बॅंक अध्यक्ष जे. के. जाधव याने १लाख ५० हजार रुपये लाच मागितली . तडजोडीअंती त्याने सव्वा लाख रुपये घेण्याची तयारी दर्शविली. त्याच्या मालकीच्या राजश्री शाहू इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेन्टच्या लेखापाल आत्माराम संतराम पवार मार्फत लाचेची रक्कम घेतली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही लाचखोराना रंगेहाथ पकडून त्यांच्याविरूध्द एम आय डी सी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविला . त्यांना अटक करून रात्री लॉकअप मध्ये डांबले होते.
आज शुक्रवारी जे. के जाधव आणि आत्माराम पवारला पोलिसांनी विशेष न्यायालयात हजर केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या शासकीय योजनेत कर्ज देताना आरोपी जाधवने पदाचा गैरवापर करून कर्जदाराकडून पैसे उकळले. शासन योजनेला खिळ बसविण्याचे काम आरोपीने केले. आणखी किती कर्जदारांकडुन त्याने पैसे उकळले आहेत याविषयी तपास करायचा आहे , दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून या गुंह्याबाबत चौकशी करायची आहे , दोन्ही आरोपींच्या आवाजाचे नमूने घ्यायचे असल्याने त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयास केली . आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. उभय पक्षाचा युक्तिवाद एकल्यानंतर न्यायालयाने जाधव आणि पवारची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली.